वॅका : एक आठवण
मंगल कार्यालय या स्थळाला महत्व येते ते तिथल्या कॅटरिंगव्यवस्था आणि जेवणाच्या क्वालिटीवरून. वरकरणी कितीही चांगल्या सुविधा असल्या तरी जिथे जेवण चांगले तो हॉल उत्तम. त्यामुळे जेवण हा हॉलच्या सु आणि कुप्रसिद्ध असण्याचा अत्यंत निकष आज. क्रिकेट खेळात अशीच प्रत्येक स्टेडियमची आपापली एक वेगळी ओळख आहे. ती ओळख बहुतांशी पीचशी किंवा आसनक्षमतेशी संबंधित जास्त. ऑस्ट्रेलियात स्टेडियम मोठी, सीमारेषा लांब. बॉल सीमारेषापार धाडणे तितकेसे सोपे नाही. टायमिंगला ताकदीची जोड जो बॅट्समन देतो तो बहुतांशी यशस्वी होतो. वॅका हे ऑस्ट्रेलियामधील एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा असलेले स्टेडियम. Fastest pitch in the world म्हणजे फास्ट बॉलिंगकरता हनिमून डेस्टिनेशन. दीपिका आणि प्रियांका एकाच वेळी आपल्यासोबत आपल्या घरात नांदतात ही कल्पना जेवढी सुखावह आहे तसं फिलिंग वॉकावर बाऊन्स आणि स्विंग एकत्र नांदल्यावर बॉलरला येतं. वेग आणि स्विंग यासोबत दुपारच्या वेळी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांनी बॉलर्सच्या आक्रमणाला अजून धार येते. या वाऱ्यांना ऑस्ट्रेलियात फ्रेमॅनट्ल डॉक्टर असं संबोधले जाते. इथली आऊटफिल्ड सुद्धा अतिशय वेगवान समजली जाते. सर्वात जलद 9 शतकांपैकी 4 शतकं ही या ठिकाणी झाली.
एक आगळीवेगळी मजा म्हणजे, इथे एका स्टँडचे नाव आहे लिली मार्श स्टँड. हे दोघे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे, पर्थ हे त्यांचे होमग्राउंड. डेनिस लिली हा महान फास्ट बॉलर, रॉडनी मार्श हा विकेटकीपर या जोडगोळीने 95 विकेट्सच्या पार्टनरशीपचा अनोखा विक्रम नावे केला. "कॉट मार्श, बोल्ड लिली हे त्याकाळी वृत्तपत्रात गाजलेले शीर्षक होते. नेहमी स्टँडला नाव हे बॅट्समन किंवा बॉलर जोडीचे दिले जाते पण हा एकमात्र स्टँड आहे जिथे बॉलर आणि विकेटकीपरच्या नावाने प्रसिद्ध आहे. अॅनालॉग स्कोरबोर्ड असलेलं जगातील काही स्टेडियम पैकी एक म्हणजे वॅका. 11 ते 16 डिसेंम्बर 1970 या कालावधीत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही या स्टेडियमवर पहिली टेस्ट खेळली गेली. आणि शेवटची टेस्ट देखील याच दोन प्रतिस्पर्धी संघात 14 ते 18 डिसेंम्बर 2017 या काळात झाली जिथे तब्बल 4 बॅट्समननी शतकं केली. जोश हेजलवुडला 5 विकेट्स मिळाल्या आणि मिशेल स्टार्कने बॉल ऑफ द सेंच्युरी टाकला.
वॅका हे नॉन ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. प्रत्येकाला तिथे आजमावून बघायचं असतं, तिथे आपली कौशल्य पणाला लावायची संधी शोधत असतो. अशा या ऐतिहासिक मैदानात प्रचंड चांगल्या वाईट अशा वैविध्यपूर्ण अनेक उलथापालथी झाल्या, अनेक विक्रम झाले.
- 1933 साली सर डॉन ब्रॅडमन यांना पाहायला त्या काळातील विक्रमी अशा 20000 फॅन्सची उपस्थिती होती.
- 24 ते 126 नोव्हेंबर 1934 या काळात महिलांचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना, पाहुणी इंग्लंड आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात वॅकावर झाला. मॉली हाईड या इंग्लिश मुलीने शतकही काढले हे विशेष.
- रोलिंग स्टोन या प्रसिद्ध बँडने 1973 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपला परफॉर्मन्स दिला
- टॉमी मॅन या ऑस्ट्रेलियन बॅट्समनने 1977 च्या सिजनमध्ये नाईट वोचमन म्हणून 108 रन्स भारताविरुद्ध काढल्या. नाईट वोचमनच्या एकूण 5 शतकांपैकी हे पहिलं शतक होतं
- 1978 साली वर्ल्डसिरीजमध्ये डेव्हिड गोवरच्या शतकामुळे इंग्लंड जिंकलं. तो अजूनही त्यांचा इथला एकमेव विजय आहे
- 1979 साली डेनिस लिली हा अल्युमिनियम बॅट घेऊन बॅटिंग करायला आला, काही वेळ झाल्यावर इंग्लंड कॅप्टन माईक ब्रेयर्लीने पंचांकडे तक्रार केली की या बॅटने बॉलचं नुकसान होतंय, तेव्हा पंचांनी लिलीला पारंपरिक लाकडी बॅट घेऊन आणायला सांगितले. याच सामन्यात इयान बोथमने दोन्ही इनिंगमध्ये मिळून 11 विकेट्स काढल्या , जी त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी आहे.
- क्रिकेटच्या इतिहासातील एक फार कटू प्रसंग लिली आणि जावेद मियाँदाद यांच्यात झाला. एकमेकांसमोर आल्यावर लिलीने त्याला लाथ मारली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून जावेद बॅट लिलीच्या डोक्यात घालायला पुढे सरसावला. पंचांनी वेळीच मध्यस्थी करून प्रसंग निभावला
- मर्व्ह ह्यूजेस या ऑस्ट्रेलियन बॉलरने 1988 साली वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि एकूण 13 बळी त्याने दोन डावात घेतले. याच सामन्यात ऑम्ब्रॉस ने जेफ लॉसनचा जबडा एका खतरनाक बाऊन्सरने फ्रॅक्चर केला
- मार्क ग्रेटबॅश या न्यूझीलंडच्या बॅट्समनने तब्बल 11 तास पिचवर तळ ठोकून 485 बॉल खेळून 146 रन्स केल्या ज्यामुळे न्यूझीलंडचा पराभव वाचला
- 1990 साली शेफिल्ड शिल्डच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी 464 रन्सची मॅरेथॉन पार्टनरशीप स्टीव्ह आणि मार्क या जुळ्या भावांमध्ये इथे झाली
- कर्टली अॅब्रोसने 1991 साली एका भन्नाट स्पेल मध्ये ऑस्ट्रेलियाच्या 1 धावेच्या बदल्यात 7 विकेट्स घेतल्या
- 1992 ची सचिन तेंडुलकरची 112 रन्सची इनिंग ही त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरली असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
- 2000 साली ग्लेन मॅकग्राने हॅटट्रिक घेत आपला 300 वा बळी म्हणून महान बॅट्समन ब्रायन लाराला आउट केले. वॅकावर सलग पराभवांनंतर ऑस्ट्रेलिया पहिलावहिला विजय इथे मिळवला
- 2003 मध्ये ग्लेन मॅकग्राने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 8-24 अशी कामगिरी केली.
- 2003 मध्ये मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वेला अक्षरशः कुटून काढत ब्रायन लाराचा 375 रन्सचा विक्रम मोडत 380 रन्स केल्या जो नंतर 400 रन करून लाराने परत या यादीत आपले शीर्षस्थान मिळवले
- जानेवारी 2008 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला येथे हरवून त्यांची सलग 16 टेस्ट मॅच विजयांची मालिका खंडीत केली
- डिसेंबर 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथ्या इनिंगमध्ये 414 रन्स चेस करून सामना जिंकला. टेस्ट क्रिकेटमधील दुसरा सर्वोत्तम चेस होता. मजा म्हणजे याच मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये मिशेल
जॉन्सनने 61 रन्स देऊन 8 विकेट्स घेतल्या होत्या.
- 2015 मध्ये एकाच मॅचमध्ये न्यूझीलंडच्या रॉस टेलर आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वोर्नर यांनी अनुक्रमे 290 आणि 253 रन्सची खेळी केली. एकाच मॅच मध्ये दोन्ही संघाकडून डबल सेंच्युरी इनिंग पाहण्याचा आगळावेगळा योग वॅकावर आला.
हे सगळं लिहिण्यामागचं प्रयोजन म्हणजे वॅका स्टेडियम इतिहासजमा होऊन एक वर्ष लोटलं. आता नव्याने तिथे पर्थ स्टेडियम उभारलं गेलं. आताच झालेल्या भारताविरुद्धचा सामन्यात पिचमध्ये वॅकाचा तो टिपिकल फ्लेवर जाणवला नाही. ते पिच फार डल वाटलं. आता वॅकासारखा आगळावेगळा ट्रॅक कुठे पाहायला मिळणे म्हणजे दादरचा रानडे रोड निर्मनुष्य दिसण्याइतकं दुरापास्त आहे. टेलरमेड ड्रॉप इन पिचची कन्सेप्ट इथे नवीन स्टेडियममध्ये आणली. म्हणजे क्युरेटर मैदानात ट्रॅक बनवत नाही, तो बाहेरून बनवून आणून आवश्यकतेनुसार लांबी रुंदी कमी जास्त करून वेगवेगळ्या खेळांकरता ती वापरता येते. ही टिपिकल बिजनेस माइंडेड स्ट्रॅटेजी कुठेतरी टेस्ट क्रिकेटच्या अस्सल बाजाला हानिकारक आहे असं वाटतं. व्यावसायिक वृत्ती कुठेतरी खेळाचा आत्मा मारतेय. वॅकाच्या ट्रॅकची आगळीवेगळी खासियत आता त्या स्टेडियमसोबत इतिहासजमा झाली याची कुठेतरी सल सतत एक दर्दी क्रिकेटरसिक म्हणून बोचत राहते
आता क्रिकेट हे अत्यंत व्यावसायिक झाले आहे, खेळाच्या मूळ गाभ्याला बगल देऊन मनोरंजन हा एकच भाग लक्षात घेऊन बॅट्समनला अनुकूल ट्रॅक बनवण्याचा कल ओव्हर्सिज स्टेडियमवर वाढतोय. मधल्या काळात मेलबर्न, ऍडलेडचा ट्रॅक कुठेतरी कानपूर किंवा बंगलोरचा वाटू लागला, किंवा भारताच्या आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातही काही वेळा पाटा पिच दिसले जिथे भारतीय बॅट्समननी हात धुवून घेतले
वॅकाने बॅट्समन बॉलर असा टिपिकल मुलगा मुलगी छाप भेदभाव केला नाही. सर्वाना समान वागणूक दिली. कुणालाही सासुरवास सहन करावा लागला नाही. उत्तम टेम्परामेंट, तंत्र, चिकाटी, संयम आणि पिचवर पाय रोवून खेळणाऱ्या बॅट्समनला आणि वेगाने उत्तम लाईन आणि लेंथवर मारा करणाऱ्या बॉलरला या ट्रॅकने भरभरून दिले. वर नमूद केलेले विक्रम पाहता हीच गोष्ट सिद्ध होते. आमचं भाग्य थोर की आम्ही निदान 20 वर्षे का होईना इथल्या मॅचेस पहाटे ब्रम्हमुहूर्तावर उठून पाहण्याचं भाग्य मिळालं. तेव्हा युट्युब नव्हतं. पहाटेच्या थंड वातावरणात तो 21 इंचाचा टीव्ही, त्यात चॅनल 9चे कॅमेरे, बिल लॉरी, रीची बेनो, टोनी ग्रेग, इयान चपला यांचं सुंदर समालोचन त्या #Golden90s च्या सुखाची परिसीमाच. हे भाग्यआता पुढच्या फ्री हिट आणि सुपर ओव्हरच्या जमान्यातील पिढीला मिळणार नाही आणि त्याची मजाही त्यांना कळणार नाही.
The fastest track in the world, none other than Waca Perth will always be missed
©दर्दी क्रिकेटरसिक ODJ.
लेखाचे स्फूर्तिस्थान: केदार ओक, पुणे
विशेष सूचना: सदर लेखातील संदर्भ हे वेगवेगळ्या स्रोतांतून घेतले आहेत, त्यात काही चुका किंवा तांत्रिक त्रुटी असल्यास त्या निदर्शनास आणून देणे आणि काही रंजक प्रसंग माहिती असल्यास ते जरूर शेयर करावे