Sunday, April 19, 2020

माई (भाग 2)
रत्नागिरी जिल्ह्याचा आत्मा, हुजूरपागा मुलींच्या शाळेतील शिक्षण आणि एकूणच त्या 'पूर्वीचे पुणे राहिले नाही' असे सतत म्हणणाऱ्या पिढीचे वंशपरंपरागत चालत आलेले संस्कार म्हणजे माई. तिच्याकडे जायचे म्हणजे कधीही जाऊन चालायचे नाही. घराबाहेर कधी यावे आणि जावे अशी पाटी जरी लिहिलेली नसली तर काही अलिखित दंडक होते.
दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी 8 नंतर उगाच कुणी घरी आलेलं तिला विशेष आवडत नसे. रात्रीचे जागरण ही गोष्ट तिच्यासाठी अब्रम्हण्यम सदरातील होती. रात्रीची वेळ ही भुतं, पिशाच्च यांच्या कामकाजाची असते आपण माणसं आहोत आपल्याला जागे राहायच्या वेळा आखून दिलेल्या आहेत असे तिचे मत होते. लवकर निजे लवकर उठे... या उक्तीला माई आयुष्यभर जागली.
एकदा तिच्याकडे मुक्कामी असताना सकाळी 9 वाजता मी उठलो यावरून तुम्ही मुंबईकर म्हणजे एक नंबरचे आळशी, कोवळं ऊन अंगावर आल्यावर तुम्हाला जाग येत नाही, पार्श्वभाग चटक्यांनी लाल झाला की तुमचे डोळे उघडणार. त्यावर मी एवढ्या पहाटे उठून कुठे सत्यनारायण करायचा एवढंच म्हणलं, तर म्हणे तेव्हा तरी पहाटे उठता की त्या सत्यनारायणाच्या दुपारच्या झोपेची वेळ झाल्यावर कथा वाचायला घेता? असा युक्तिवाद व्हायचा.
डोंबिवलीकर मंडळींची एक खासियत आहे ती म्हणजे डोक्यावर पंखा सुरू असलेला दिसल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ती आमची डोंबिवलीची भाची प्राजक्ता, तुझीच बहीण, बाहेर बर्फ जरी पडत असला तरी अंगात 4 स्वेटर घालून, एक पांघरूण आणि ब्लॅंकेट घेईल पण पंखा 1 वर तरी चालू ठेऊनच झोपेल. हे माझे नव्हे तर तिचे observation. बऱ्याच अंशी ते खरेही आहे. पंखा ही फक्त मार्च ते मे हे तीनच महिने लागतो असे तिचे प्रांजळ मत. पण उन्हाळा आणि पावसाळा असे दोनच ऋतू माहिती असलेल्या डोंबिवलीकरास अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत त्या निवाऱ्यात पंखा ही एक मूलभूत गरज आहे हे तिला कधी पटले नाही.
पुण्याच्या पलीकडे त्याहूनही पंधरा वीस पेठांच्या बाहेर रम्य आकर्षक असं जगात काही असू शकत यावर तिचा विश्वास नव्हता. लकडी पुलाच्या पलीकडे असलेलं पुणं म्हणजे टॉवरमध्ये गुप्तपणे राहणाऱ्या निर्वासित पांढरपेशा मंडळींचा रेफ्युजी कॅम्प. नुसतं पत्त्यापुढे ४११ च्या कोणतेही तीन आकडे खरडले म्हणजे पुणेकर झालो आपण असे प्रत्येक माणूस समजतो हे तिचे मत.आज हॅपनिंग मानल्या जाणाऱ्या 'कोथरूड' या भागाचे पुण्याच्या भौगोलिक क्षेत्रामधले अस्तित्व तिने साधारण एक दशक ओलांडल्यावर मान्य केले
कोकणात तिची वडिलोपार्जित जमीन होती, लाल माती, ते शेणाने सारवलेल्या जमिनीचे घर, माडी,पडवी, ओसरी, तुळशीवृंदावन, अंगणात हापूस वगैरे टिपिकल सगळं होतं पण त्या सगळ्यावर अनेक भावंडांचे दावे होते. बरं बालपण पुण्यात गेल्याने तिला तिथली विशेष ओढही नव्हती वा तिटकाराही नव्हता. तिला तिथल्या मातीशी जिव्हाळा नक्कीच होता, पण मालमत्तेच्या वादात भावंड मनाने दुरावली असल्याने बोलण्यातून अगतिकता कायम जाणवे
होळीला, रामनवमीला, एकादशीला होणारे उत्सव, त्यातील कीर्तन, महाप्रसाद वगैरे यथेच्छ वर्णनं तिच्याकडून मी ऐकली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण रिक्षा तिला फार आवडायच्या. एखाद्या नव्या नवरीला सजवावे तसे कोकणातील रिक्षावाले आपल्या रिक्षाला सजवतात हे मला सर्वप्रथम तिने सांगितले. कोकणात घर असलेल्या अनेक मित्रांकडून हे मला अजूनही ऐकायला मिळते. भगवान परशुराम कधीतरी आमच्यावर प्रसन्न होवो आणि हे सगळं अनुभवायची संधी आम्हाला ते देवो ही इच्छा.
बहुतांश लोकांप्रमाणे तिला आंबा या फळाचे सर्वाधिक आकर्षण. सुनेला जसा माहेरचा पाहुणा घरी येणार ह्या कल्पनेनं भरून येतं तशी तिला मार्च महिन्यात मंडईत कैऱ्या दिसल्यावर होत असे. मग कोकणात गावी तिकडे जोगळेकर का केळकर यांना फोनाफोनी सुरू व्हायची. आगाऊ बुकिंग करून ठेवतेय, दुसऱ्या कुणाला पेटी पाठवली तर याद राखा असा तिचा सज्जड दम होता. हवं तर या महिन्याला किराणा कमी भरू पण आंबा हा किमान दोन महिने वास्तव्याला असला पाहिजे असे तिचे मत. गोखले कुटुंबाच्या घराच्या ओसरीवर उन्हाळ्यात कायम रिकाम्या आंब्याच्या पेट्या व्यवस्थित ठेवलेल्या दिसायच्या. मध्येच फटीतून गवत बाहेर येतंय, चुरगळलेला पेपर अस्ताव्यस्त पडलाय असे नाही.
अगं माई, तुला डायबेटीस आहे, आंबे कसले खातेस? असं विचारलं की आयुष्यात एकच गोष्ट चवीने खावीशी वाटते तेही दोनच महिने मिळते, खड्डयात गेली ती तुमची डायबेटीस. सलाईन मधलं ग्लुकोस खाऊन जाण्यापेक्षा वर जाण्यापेक्षा आंबे खाऊन गेलेलं परवडेल. मग हा प्रतिवाद ऐकून अण्णा गोखले म्हणायचे, पुलं अंतू बर्व्याला पाहून नव्हे तर हिला पाहून म्हणाले असतील की एरवी साखर हिच्या जिभेवर कधी नाही पडली पण रक्तात मात्र हमखास पडली. असुदे असुदे. जिभेतुनच रक्तात जाते साखर असे त्यावर उत्तर यायचे. हे सगळे हुजूरपागा शाळेचे विद्यार्थी असलेच का ? असे अण्णा हळूच कानात सांगून हसायचे
एकदा तिच्या कोणा एका परदेशी नातेवाईकाने आंब्याचा रस मिक्सरमध्ये काढला असे फोनवर बोलताना कळवले. त्यावर तिचं पित्त जे खवळलं. आंब्याचा रस हाताने कसा काढावा, का काढावा ह्यावर तिने अर्धातास तिला सुनावलं. माणूस म्हणून तुम्ही जगण्याच्या लायकीचे नाही हा शेराही तिने मारला. अण्णा म्हणाले, जाऊदे गं ती काही का करेना, तू कशाला शाळा घेतलीस तिची? माईचे उत्तर एपिक सदरात मोडणारे होते. एवढी वर्षे संसार झाला तरी तुम्हाला मी कळले नाही हो, खुळेच आहात. कॉल इनकमिंग होता, आपल्या बिलात पैसे का लागणार आहेत. स्वतः एवढे कष्ट घेऊन अमेरिकेला फोन करण्याची हौस मला मेली कुठली?
लेख मोठा होत असल्याने कंटाळवाणा होऊ नये म्हणून या भागावरील वाचकांच्या प्रतिक्रिया पाहूनच पुढील भाग पोस्ट केला जाईल.
(क्रमशः) #MaaiGokhale
©ODJ
माई

नातं निर्माण व्हायला काही कारण लागत नाही. माझ्या मते ‘व्हेवलेंथ’ ही गोष्ट त्याकरता पुरेशी आहे. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या नात्याचं काही बारसं करताच येत नाही. कारण ती रक्ताची नसतात. रक्तापलीकडे असलेल्या पण त्याची वीण रक्ताच्या नात्याएवढी घट्ट असलेल्या नात्याला नाव आपल्याला देत येत नाही. हे असं बेनामी नातं मात्र मायेचा प्रेमाचा एक सुंदर सुगंध देतं, जो दिसत नाही पण त्याचा फील नक्कीच येतो.
जन्मल्यापासून चित्पावन ब्राम्हण समाजाशी आणि पुणे शहराशी माझं एक विशेष नातं आहे. वास्तविक या शहराशी आणि चित्पावन मंडळींशी जोडलेली नाळ अजूनही कायम आहे पंचवीस एक वर्षांपूर्वी जेव्हा शाळकरी मित्र उन्हाळी सुट्टीत कोकणात जायचे, पण मी एकटाच इसम असायचो जो पुण्यात जाई.
नातेवाईक मंडळींकडे राहून वगैरे आलं की एक चक्कर व्हायची ती जगप्रसिद्ध अशा पुण्यातील बर्म्युडा ट्रायंगल असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठ या भागात. त्यातील सदाशिव पेठ ही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणल्यास वावगं ठरू नये. पुलंनी म्हणल्याप्रमाणे एखाद्या सुरकुत्यानी फुललेल्या म्हातारीने भरतनाट्यमची पोज घेऊन उभे राहावे तशी दिसणारी काही घरं पुण्यात होती. तसंच काहीसं ‘गोखले’ कुटुंबाच्या घराची इमारत. अरुंद जिन्यातून तीन मजले खाली वर केल्यावर माणूस सिंहगड चढायला कुरकुरणार नाही.
मंजुषा उर्फ माई गोखले ही बाई 70च्या पुढे असली काही थकलेली, कमरेत वाकलेली अजिबात नव्हती. अतिशय गृहकर्तव्यदक्ष, काटेकोर, शिस्तप्रिय आणि तोंडाने फटकळ होती. घारे डोळे, गोरीपान कांती, सडपातळ अशी ती सतत टवटवीत आणि कायम काहीना काही उद्योगात गुंतलेली असायची. विश्रांती ही गोष्ट फक्त शारीरिक गरज म्हणून तिच्यासाठी होती. मनाला ते मान्य नव्हतं. तोंडाचा पट्टा हा अखंड सुरू असायचा. घरात कुणी असलं तर त्याच्याशी बोल नाहीतर घरात काम करताना एकटं बडबडणे किंवा काहीतरी सतत गुणगुणत बसायची. गप्प बसून काही करणे हे तिच्यासाठी निषिद्ध असावं.
माईचे यजमान केशवराव उर्फ अण्णा गोखले हे थोडे विरुद्ध पठडीतील. एकरांती चित्पावन असून सुद्धा देशस्थ ऋग्वेदी कुळाच्या जवळ जाणारा स्वभाव. मृदू बोलणे, वेंधळेपणा हा त्यांचा स्थायी भाव. घरात यावरून माई आणि त्यांचे प्रेमाचे संभाषण सतत सुरू असायचे. “त्या मंडईतला भाजीवाल्याला आपण काय दत्तक घेतले का हो? 3 रुपये किलो बटाटा असताना तुम्ही 5 रुपये त्याला देऊन आलात. आपल्या पूर्वजांनी मनीप्लांटच लावलाय हो अंगणात, त्याचा वेल वाढून आपल्या खिडकीतून आत आल्यासारखे तुम्ही पैसे उधळताय”. वैकुंठाला जाताना चार पैसे हाताशी असुद्या नाहीतर डायरेक्ट ओंकारेश्वरलाच न्यावे लागेल”.
20 22 वर्षांपूर्वी आमच्या वडिलांसोबत त्यांच्याकडे गेलो असताना अथर्वशीर्ष म्हणून दाखव अशी दमदार आज्ञा माईकडून आली. वडिलांच्या शिकवणीचा कस लागण्याची पहिलीच वेळ कदाचित आल्याने, आता हा काय म्हणतोय या टेन्शनने भर डिसेम्बर महिन्यात त्यांच्या कपाळावरून ओघळणारा घामाचा थेंब अजूनही आठवतोय. सुदैवाने मी व्यवस्थितपणे अथर्वशीर्ष म्हणून दाखवले आणि गोखले कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव उमटले. बिदागी म्हणून आजोबांनी दिलेले 11 रुपये आणि उच्चार अगदी स्पष्ट आणि शुद्ध हो लेकाचे तुझ्या दिलीप असं म्हणत माईंनी दिलेली चितळेची आंबा बर्फी अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्या 11 रुपयांच्या बिदागीचे मोल माझ्यासाठी हल्लीच्या भाषेत वर्थ मिलियन डॉलरस होते.
सत्यनारायण पूजेला गव्हाऐवजी तांदूळ मांडले तरी चालतात हा साक्षात्कार माईमुळे झाला. आमच्या कोकणात तांदूळ पिकतो, तुझ्या देशावर गहू म्हणून तुम्ही गहू तर आम्ही तांदूळ ठेवतो इतकं स्पष्ट विवेचन तिने केलं. कुळीथ नावाचा खाद्यपदार्थ असतो हे मला माईने मला वयाच्या 16 व्या वर्षी दाखवले. चणाडाळी ऐवजी पिठलं हा पदार्थ कुळथापासून सुद्धा बनतो हे मला नव्याने कळले.
फणसातील अठळी ही फक्त गरे खाऊन कचऱ्यात टाकायला देवाने निर्माण केलेली नाही असे माईचे वाक्य मला आजही आठवते. त्यानंतर मी अठळी कचऱ्यात आजतागायत टाकायची हिंमत केलेली नाही. सुपारीचे तुकडे हे विळी किंवा सुरीने चिरून होत नाहीत तर त्यासाठी अडकित्ता नावाचं शस्त्र मी पेठेतील या गोखल्यांच्या घरातील एका पेटीत सन्मानाने ठेवलेलं पहिल्यांदा पहिलं. मीठ लावून उन्हात गरम केलेल्या जांभळाची अवीट चव मी प्रथम माईमुळे अनुभवली.
तांदळाची सालपापडी नावाचा प्रकार मी तिच्या हातचा पहिल्यांदा खाल्ला. माईकडे उदरभरण करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. बाहेरच्या तिखट आणि चमचमीत खाण्याची सवय असलेल्या मला माईच्या पद्धतीच्या अशा तुलनेने अळणी आणि सपक स्वयंपाकाशी जुळवून घेणे जड जायचे. अर्धी बरणी तिखट नरड्यात घातलं की जेवण जात नाही का तुला ओंकारा. मिरचीचा व्यापार करणाऱ्याचीच मुलगी आण हो. घालील तुला दिवसरात्र मिरच्या खायला.
हल्लीच्या जमान्यात पौष्टिक पण नॉन ग्लॅमरस सदरात गणल्या जाणाऱ्या भाज्या हमखास मंडईतुन ती आणायची. लाल माठ, दोडका, शेपू, भोपळा, अंबाडी, सुरण वगैरे मला न आवडणाऱ्या भाज्या हमखास ती माझे आगमन झाल्यावरच घेऊन यायची. माईपुढे माझा आवाज चालत नाही हे ओळखून कदाचित मातोश्री तिच्याशी मुद्दाम संगनमत करून ह्या भाज्या माझ्या नरड्यात कोंबायचा प्लॅन बनवत असावी असा संशय मला कायम येई.
(क्रमशः) #MaaiGokhale
लेख मोठा होत असल्याने कंटाळवाणा होऊ नये म्हणून या भागावरील वाचकांच्या प्रतिक्रिया पाहूनच पुढील भाग पोस्ट केला जाईल.
©ODJ

Friday, July 5, 2019

मामाची आजी..

ए बाळा, उठ!! "तिन्हीसांजेला झोपू नये, लक्ष्मीचा वास यावेळी असतो". तिन्हीसांज हा शब्द पहिल्यांदा कानी पडला तो तिच्यामुळे. अर्थात तिच्यामुळे नंतर शब्दसंग्रहात जी भर पडली त्याबद्दल मी आजन्म ऋणी आहेच. अशारितीने तिन्हीसांजेला झोपू नये, हा संस्कार अंगवळणी पडला. मग हातपाय तोंड धुवून होईपर्यंत देवापुढे निरांजन आणि उदबत्ती लावून पाट ठेवले जायचे, मग ती, आजोबा, आणि जो कुणी नातू हजर असेल त्याला शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते म्हणणे सक्तीचे होते. त्याशिवाय रात्रीचे जेवणाचे पान मिळायचे नाही. वास्तविक ती माझी नुसती आजी नव्हती. वास्तविक ती माझ्या आईची आई, पण मी तिला 'मामाची आजी' म्हणायचो. मोठे झाल्यावर हीच सवय रूढ झाली

प्रभू श्रीरामचंद्रावर तिची निस्सीम श्रद्धा. 'नमस्कार करते रे रामराया, चुकले असेन तर अपराध पोटात घे रे रामराया' अशी वाक्ये सर्रास कानी पडायची.
"माता रामो मत्पिता रामचन्द्रः, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः, सर्वस्वं मे रामचन्द्रो दयलुर्नान्यं,
जाने नैव जाने न जाने" ही रामरक्षेतील तिची आवडती वचनं. मी गमतीत कायम म्हणायचो, भाजपने राममंदिर मुद्द्यावर प्रचारक म्हणून हिला घ्यायला हवं,  नक्की फायदा झाला असता. रामरक्षा पाठ असणं हे तिच्यासाठी पाढे, इंग्लिश अल्फाबेट्स येण्याइतक आवश्यक होतं. तिची मुलं, सून, जावई, नातवंड, भाचे पुतणे गॅंग, शेजारी दिसेल त्या सर्वांना रामरक्षा पाठ करायला सांगयला कमी केलं नाही. मला तर पाटावर बसवून, हात जोड, म्हण, 'अस्यश्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य, बुधकौशिकऋषी:' मग एका स्वरात, एका लयीत रामरक्षेचे सामूहिक पठण व्हायचे. चुकीचे उच्चार हे तिला अजिबात खपायचे नाहीत, जरा काही इकडंच तिकडे झालं, की ते पूर्ण वचन नंतर 10 वेळा घोटवून घ्यायची. श्रीरामाला 2 वेळा नैवैद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा कण तिच्या पोटात गेला नाही. माझा रामराया जेवल्याशिवाय मी कशी जेवणार, हे वाक्य मला अजूनही आठवतं

स्वतः शिक्षिका असल्याने प्रचंड शिस्तप्रिय आयुष्य तिचे होते. वेळच्या वेळी उठणे, जेवणं, अभ्यास, खेळणं, झोप इत्यादी गोष्टी झाल्या पाहिजेत हा आग्रह. तळणीचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ त्यात मुरांबा मग एका बरणीत कैरीचा, एकात अननस, एकात तोतापुरी आंब्याचा अशी चंगळ होती. कैरी, लिंबू, आवळा अजून सतराशे साठ प्रकारची लोणची, तसेच लसूण, जवस, कारळं (कारलं नव्हे ते वेगळं) ह्याच्या चटण्या असा बेडेकर गृहउद्योग दुकानात असलेला जवळपास सर्व स्टॉक घरी असायचा. पोळीशी तोंडी लावायला खायचे काय हा प्रश्न कधी तिच्या हयातीत पडला नाही. मीठ आणि लाल तिखट हे जिन्नस चव आणण्यापुरतेच प्रमाणात घालावेत, पदार्थ अळणी किंवा अतिमसालेदार नसावे. सात्विक आहाराकडे तिचा कल होता.

स्वयंपाक करताना गाणी म्हणायला तिला फार आवड. फडके, हृदयनाथ, लताबाई, आशाबाई, सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांच्या ओळी सतत तोंडी. आनंदघन म्हणजे लताबाईंचं 'राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग, गडनी सजनी गडनी सजनी गं' हे तिचं आवडतं गाणं असावं, बऱ्याचदा तिच्या विशिष्ट स्वरात खूपदा हे ऐकू येई. कधी विळीवर भाजी चिरताना बोट कापलं, किंवा पोळ्या करताना हाताला गरम तवा लागला तर तिथेही 'रागावलास का रे रामराया?' हे उद्गार निघत. तिने जे जे काही स्वतः करून पानात वाढले, ते कधीच बेचव लागले नाही. नंतर हवं तर घेऊ नका पण पानात वाढलेलं कधीही टाकायचं नाही हा कटाक्ष तिचा असे. टाकणं म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान. तिच्यालेखी हा अजामीनपात्र गुन्हा असे. जेवायला सुरुवात करायची आधी 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे..सुरू करून जय जय रघुवीर समर्थ' म्हणल्याशिवाय जेवण सुरू झाले नाही. हल्ली एलईडी टीव्ही समोर असल्या शिवाय जेवणं सुरू होत नाहीत. टेबलवर बसून जेवणे ही आंग्लप्रथा तिला पटली नाही. मांडी घालून खाली चित्रावती घालूनच जेवायला बसण्याकडे तिचा दंडक होता

गुरुवार, शनिवार, संकष्टी, चंपाषष्ठी, हरतालिका, एकादशी अश्या अनंत उपवासांची जंत्री असलेली तिची वेगळी दिनदर्शिका होती. हे उपवास स्वार्थी हेतूने नसून फक्त तिच्या श्रद्धेपोटी करायची. तिचा उपवास हा खरा उपवास होता. उपवासाच्या नावाखाली साबुदाणा, वरीच्या पदार्थांचे, ज्यूस, राजगिरा लाडू, बटाट्याचा चिवडा असे चेंज ऑफ डायटचा भंपकपणा तिने केला नाही. फक्त पाणी पिऊन, अन्नग्रहण न करता नेटाने ती करायची. त्या त्या उपवासाच्या दिवशी त्या त्या देवळात जाऊन यायची. तिथे भजन कीर्तन असेल तर आवडीने ऐकायला बसायची. रामनवमीच्या दिवशी तरी विशेष आनंदी असायची. पहाटे उठून रामरक्षा म्हणल्यावर, सकाळी आवरता आवरता गदिमा आणि बाबूजींनी अजरामर केलेलं गीत रामायणाच्या कॅसेट्स आदल्या दिवशी शोधून त्या दिवशी बरोबर टेपरेकॉर्डरवर लावायची.  बाबूजींनी श्रीराम श्रीराम श्रीराम..असे म्हणून स्वये श्रीरामप्रभु ऐकती सुरू व्हायचे ते थेट त्याचा शेवट साधारण श्रीराम...ह्या रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण ह्या गाण्यातील सादेने व्हायचा.

ज्या काळात क्रिकेट फक्त पुरुष कोचावर तंगड्या पसरून बघताना बायका नाकं मुरडून आतल्या खोलीत जायच्या, त्या काळात ही घरातील समस्त पुरुषांसोबत टीव्हीसमोर बसून मॅच पाहायची. मॅचची वेळ आधीच पाहून त्यानुसार ती कामं आटपून घ्यायची. डीआरएस तंत्रज्ञान नसताना सुद्धा बॅट्समन लेग बिफोर आहे की नाही याचा अंदाज तिचा बऱ्याचदा खरा निघायचा. पिच आउटसाईड द लेग स्टंप आहे ओंकार, ह्याच्या बापसाने आउट दिलंय का? यांना मारायची घाई का असते, जरा म्हणून अंगी संयम नाही, तो सचिन एकटा काय करेल. केवढंस ते पोर, किती भार सोसेल?  पाकिस्तान संघावर तिचा फार राग. पाकडे हा तिचा परवलीचा शब्द. हाण रे सच्या त्या अक्रमला, कुंबळे उडव रे दांडी त्या बटाट्याची, हा अनवर मेला हलकट लेकाचा आउट होत नाही लवकर इत्यादी असे अनेक संवाद कुणा आजीच्या तोंडी ऐकलेला, तसेच त्यापुढे जाऊन आजीसोबत घरात क्रिकेट खेळायचे दुर्मिळ भाग्य असलेला कदाचित की एकमेव नातू असेन. पाकिस्तानशी मॅच शुक्रवारी असेल तर त्यांना तो लकी असतो ही महत्वाची गोष्ट सर्वप्रथम तिच्याकडूनच मी ऐकली.

ज्या काळात बायका अर्थार्जन करायला बाहेर पडत नव्हत्या त्या काळात एका खेडवळ भागातील शाळेत शिक्षिकेची नोकरी जवळपास तीन दशके तिने केली. तेही तीन मुलांना सांभाळून. त्यांचे दप्तर, डबे, पुस्तकं, सकाळचा स्वयंपाक, कपडे, भांडी, केरकचरा इत्यादी अनेक आव्हानं पार करून, डोंबिवलीला गाडी पकडून ती सकाळी 7 ला शाळेत पोहचायची. त्या काळात गाड्यांची उपलब्धता आजच्या इतकी नव्हती. एक लोकल चुकली की एक तासाने पुढची लोकल असे. निवृत्त झाल्यावर तिने वानप्रस्थाश्रमात उपासना करता करता अनेक छंद तिने जोपासले. मुलांच्या लग्नाची जबाबदारी पार पडल्यावर तिने जवळपास पूर्ण भारत पालथा घातला. काश्मीर ते कन्याकुमारी ती मनसोक्त फिरली. तिला प्रत्येक ठिकाणचे प्रवासवर्णन लिहायचा छंद होता. त्याची काही टिपणं आजही माझ्या संग्रही आहेत.

तिच्या पदरात आलेल्या सर्व नातवांचा तिने अतिशय मायेने सांभाळ केला, त्यांच्यासोबत ती लहान झाली. घास भरवताना एक होता काऊ, एक होती चिऊची गोष्ट असुदे, किंवा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..ऐकल्याशिवाय मी तर कधीच झोपलो नाही ही आठवण आमच्या मातोश्री कायम सांगतात. आपल्या हाती लागलेलं पोर संस्काररुपी साबणाने चापून चोपून लक्ख करून जगात पाठवायचे हे एकमेव ध्येय तिचे होते. बाकी भावंडांपेक्षा जास्त सहवास तिचा मला लाभला.

माझं पहिलं टया ते नोकरीचे पहिले वर्ष ही मजल तिने बघितली. खासकरून माझ्यासारख्या वांड मुलाला तिने ज्याप्रकारे सांभाळले त्यासाठी तिचे डोंबिवलीच्या रामनगर परिसरातील चौकाचौकात कौतुकाचे होर्डिंग, फ्लेक्स लावावे असा मानस मामामंडळींचा होता. तिची अभ्यास घेण्याची स्वतंत्र पद्धत होती. छडी लागे छम छम वर तिचा विश्वास कधीच नव्हता. मारण्याने मुलं कोडगी होतात असे तिचे ठाम मत. अबोला धरणे हे तिचे ब्रह्मस्त्र होते. तिचा अबोला टाळण्यासाठी घरात कुणीही तिला आवडत नाही असे वागले नाहीत. घरात आलेल्या सर्व पाहुण्यांना शक्यतो जेऊच घालून पण ते शक्य नसल्यास हातावर काहीतरी दिल्याशिवाय जाऊ तिने दिले नाही. प्रत्येकाचा आनंदाने आणि आपलेपणाने पाहुणचार केला

आज आयपॅड हातात घेऊन स्कैप, गुगल ड्युओ किंवा तत्सम साधन वापरून नातवाशी संवाद साधणाऱ्या आजी पाहिल्या की त्या नातवांची कीव येते. स्वतःच्या हाताने केलेला रवा बेसनाचे लाडू, पोह्याचा चिवडा घरी त्या आयपॅड मधून दाखवून तू आलास की देईन असे म्हणताना अशा एका आजीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर डोळ्यांतून पाणी तरळताना बघून मन हेलावलं आणि माझे बालपण आठवल, तिच्यावर काहीसं लिहावसं वाटलं. लिहायला गेलं तर पुस्तक सुद्धा लिहू शकेन पण कुठेतरी अनावर होऊन थांबलो लिहिता लिहिता परत एकदा लहान झालो, त्या #Golden90s च्या काळात गेलो. ती आज माझ्यापाशी नाही पण मला लहान करायचे सामर्थ्य ह्या तिच्या आठवणींशिवाय दुसऱ्या कशातही नाही.

©नशीबवान नातू ODJ

Saturday, December 22, 2018

वॅका : एक आठवण

मंगल कार्यालय या स्थळाला महत्व येते ते तिथल्या कॅटरिंगव्यवस्था आणि जेवणाच्या क्वालिटीवरून. वरकरणी कितीही चांगल्या सुविधा असल्या तरी जिथे जेवण चांगले तो हॉल उत्तम. त्यामुळे जेवण हा हॉलच्या सु आणि कुप्रसिद्ध असण्याचा अत्यंत निकष आज. क्रिकेट खेळात अशीच प्रत्येक स्टेडियमची आपापली एक वेगळी ओळख आहे. ती ओळख बहुतांशी पीचशी किंवा आसनक्षमतेशी संबंधित जास्त. ऑस्ट्रेलियात स्टेडियम मोठी, सीमारेषा लांब. बॉल सीमारेषापार धाडणे तितकेसे सोपे नाही. टायमिंगला ताकदीची जोड जो बॅट्समन देतो तो बहुतांशी यशस्वी होतो. वॅका हे ऑस्ट्रेलियामधील एक जगप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा असलेले स्टेडियम. Fastest pitch in the world म्हणजे फास्ट बॉलिंगकरता हनिमून डेस्टिनेशन. दीपिका आणि प्रियांका एकाच वेळी आपल्यासोबत आपल्या घरात नांदतात ही कल्पना जेवढी सुखावह आहे तसं फिलिंग वॉकावर बाऊन्स आणि स्विंग एकत्र नांदल्यावर बॉलरला येतं. वेग आणि स्विंग यासोबत दुपारच्या वेळी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांनी बॉलर्सच्या आक्रमणाला अजून धार येते. या वाऱ्यांना ऑस्ट्रेलियात फ्रेमॅनट्ल डॉक्टर असं संबोधले जाते. इथली आऊटफिल्ड सुद्धा अतिशय वेगवान समजली जाते. सर्वात जलद 9 शतकांपैकी 4 शतकं ही या ठिकाणी झाली.

एक आगळीवेगळी मजा म्हणजे, इथे एका स्टँडचे नाव आहे लिली मार्श स्टँड. हे दोघे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे, पर्थ हे त्यांचे होमग्राउंड. डेनिस लिली हा महान फास्ट बॉलर, रॉडनी मार्श हा विकेटकीपर या जोडगोळीने 95 विकेट्सच्या पार्टनरशीपचा अनोखा विक्रम नावे केला. "कॉट मार्श, बोल्ड लिली हे त्याकाळी वृत्तपत्रात गाजलेले शीर्षक होते. नेहमी स्टँडला नाव हे बॅट्समन किंवा बॉलर जोडीचे दिले जाते पण हा एकमात्र स्टँड आहे जिथे बॉलर आणि विकेटकीपरच्या नावाने प्रसिद्ध आहे. अॅनालॉग स्कोरबोर्ड असलेलं जगातील काही स्टेडियम पैकी एक म्हणजे वॅका. 11 ते 16 डिसेंम्बर 1970 या कालावधीत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही या स्टेडियमवर पहिली टेस्ट खेळली गेली. आणि शेवटची टेस्ट देखील याच दोन प्रतिस्पर्धी संघात 14 ते 18 डिसेंम्बर 2017 या काळात झाली जिथे तब्बल 4 बॅट्समननी शतकं केली. जोश हेजलवुडला 5 विकेट्स मिळाल्या आणि मिशेल स्टार्कने बॉल ऑफ द सेंच्युरी टाकला.

वॅका हे नॉन ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचे ड्रीम डेस्टिनेशन आहे. प्रत्येकाला तिथे आजमावून बघायचं असतं, तिथे आपली कौशल्य पणाला लावायची संधी शोधत असतो. अशा या ऐतिहासिक मैदानात प्रचंड चांगल्या वाईट अशा वैविध्यपूर्ण अनेक उलथापालथी झाल्या, अनेक विक्रम झाले. 

- 1933 साली सर डॉन ब्रॅडमन यांना पाहायला त्या काळातील विक्रमी अशा 20000 फॅन्सची उपस्थिती होती.
- 24 ते 126 नोव्हेंबर 1934 या काळात महिलांचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना, पाहुणी इंग्लंड आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघ यांच्यात वॅकावर झाला. मॉली हाईड या इंग्लिश मुलीने शतकही काढले हे विशेष.
- रोलिंग स्टोन या प्रसिद्ध बँडने 1973 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपला परफॉर्मन्स दिला
- टॉमी मॅन या ऑस्ट्रेलियन बॅट्समनने 1977 च्या सिजनमध्ये नाईट वोचमन म्हणून 108 रन्स भारताविरुद्ध काढल्या. नाईट वोचमनच्या एकूण 5 शतकांपैकी हे पहिलं शतक होतं
- 1978 साली वर्ल्डसिरीजमध्ये डेव्हिड गोवरच्या शतकामुळे इंग्लंड जिंकलं. तो अजूनही त्यांचा इथला एकमेव विजय आहे
- 1979 साली डेनिस लिली हा अल्युमिनियम बॅट घेऊन बॅटिंग करायला आला, काही वेळ झाल्यावर इंग्लंड कॅप्टन माईक ब्रेयर्लीने पंचांकडे तक्रार केली की या बॅटने बॉलचं नुकसान होतंय, तेव्हा पंचांनी लिलीला पारंपरिक लाकडी बॅट घेऊन आणायला सांगितले. याच सामन्यात इयान बोथमने दोन्ही इनिंगमध्ये मिळून 11 विकेट्स काढल्या , जी त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी आहे.
- क्रिकेटच्या इतिहासातील एक फार कटू प्रसंग लिली आणि जावेद मियाँदाद यांच्यात झाला. एकमेकांसमोर आल्यावर लिलीने त्याला लाथ मारली, ज्याला प्रत्युत्तर म्हणून जावेद बॅट लिलीच्या डोक्यात घालायला पुढे सरसावला. पंचांनी वेळीच मध्यस्थी करून प्रसंग निभावला
- मर्व्ह ह्यूजेस या ऑस्ट्रेलियन बॉलरने 1988 साली वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि एकूण 13 बळी त्याने दोन डावात घेतले. याच सामन्यात ऑम्ब्रॉस ने जेफ लॉसनचा जबडा एका खतरनाक बाऊन्सरने फ्रॅक्चर केला
- मार्क ग्रेटबॅश या न्यूझीलंडच्या बॅट्समनने तब्बल 11 तास पिचवर तळ ठोकून 485 बॉल खेळून 146 रन्स केल्या ज्यामुळे न्यूझीलंडचा पराभव वाचला
- 1990 साली शेफिल्ड शिल्डच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी 464 रन्सची मॅरेथॉन पार्टनरशीप स्टीव्ह आणि मार्क या जुळ्या भावांमध्ये इथे झाली
- कर्टली अॅब्रोसने 1991 साली एका भन्नाट स्पेल मध्ये ऑस्ट्रेलियाच्या 1 धावेच्या बदल्यात 7 विकेट्स घेतल्या
- 1992 ची सचिन तेंडुलकरची 112 रन्सची इनिंग ही त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरली असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.
- 2000 साली ग्लेन मॅकग्राने हॅटट्रिक घेत आपला 300 वा बळी म्हणून महान बॅट्समन ब्रायन लाराला आउट केले. वॅकावर सलग पराभवांनंतर ऑस्ट्रेलिया पहिलावहिला विजय इथे मिळवला
- 2003 मध्ये ग्लेन मॅकग्राने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 8-24 अशी कामगिरी केली.
- 2003 मध्ये मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वेला अक्षरशः कुटून काढत ब्रायन लाराचा 375 रन्सचा विक्रम मोडत 380 रन्स केल्या जो नंतर 400 रन करून लाराने परत या यादीत आपले शीर्षस्थान मिळवले
- जानेवारी 2008 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला येथे हरवून त्यांची सलग 16 टेस्ट मॅच विजयांची मालिका खंडीत केली
- डिसेंबर 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथ्या इनिंगमध्ये 414 रन्स चेस करून सामना जिंकला. टेस्ट क्रिकेटमधील दुसरा सर्वोत्तम चेस होता. मजा म्हणजे याच मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये मिशेल
जॉन्सनने 61 रन्स देऊन 8 विकेट्स घेतल्या होत्या.
- 2015 मध्ये एकाच मॅचमध्ये न्यूझीलंडच्या रॉस टेलर आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वोर्नर यांनी अनुक्रमे 290 आणि 253 रन्सची खेळी केली. एकाच मॅच मध्ये दोन्ही संघाकडून डबल सेंच्युरी इनिंग पाहण्याचा आगळावेगळा योग वॅकावर आला.
हे सगळं लिहिण्यामागचं प्रयोजन म्हणजे वॅका स्टेडियम इतिहासजमा होऊन एक वर्ष लोटलं. आता नव्याने तिथे पर्थ स्टेडियम उभारलं गेलं. आताच झालेल्या भारताविरुद्धचा सामन्यात पिचमध्ये वॅकाचा तो टिपिकल फ्लेवर जाणवला नाही. ते पिच फार डल वाटलं. आता वॅकासारखा आगळावेगळा ट्रॅक कुठे पाहायला मिळणे म्हणजे दादरचा रानडे रोड निर्मनुष्य दिसण्याइतकं दुरापास्त आहे. टेलरमेड ड्रॉप इन पिचची कन्सेप्ट इथे नवीन स्टेडियममध्ये आणली. म्हणजे क्युरेटर मैदानात ट्रॅक बनवत नाही, तो बाहेरून बनवून आणून आवश्यकतेनुसार लांबी रुंदी कमी जास्त करून वेगवेगळ्या खेळांकरता ती वापरता येते. ही टिपिकल बिजनेस माइंडेड स्ट्रॅटेजी कुठेतरी टेस्ट क्रिकेटच्या अस्सल बाजाला हानिकारक आहे असं वाटतं. व्यावसायिक वृत्ती कुठेतरी खेळाचा आत्मा मारतेय. वॅकाच्या ट्रॅकची आगळीवेगळी खासियत आता त्या स्टेडियमसोबत इतिहासजमा झाली याची कुठेतरी सल सतत एक दर्दी क्रिकेटरसिक म्हणून बोचत राहते

आता क्रिकेट हे अत्यंत व्यावसायिक झाले आहे, खेळाच्या मूळ गाभ्याला बगल देऊन मनोरंजन हा एकच भाग लक्षात घेऊन बॅट्समनला अनुकूल ट्रॅक बनवण्याचा कल ओव्हर्सिज स्टेडियमवर वाढतोय. मधल्या काळात मेलबर्न, ऍडलेडचा ट्रॅक कुठेतरी कानपूर किंवा बंगलोरचा वाटू लागला, किंवा भारताच्या आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातही काही वेळा पाटा पिच दिसले जिथे भारतीय बॅट्समननी हात धुवून घेतले

वॅकाने बॅट्समन बॉलर असा टिपिकल मुलगा मुलगी छाप भेदभाव केला नाही. सर्वाना समान वागणूक दिली. कुणालाही सासुरवास सहन करावा लागला नाही. उत्तम टेम्परामेंट, तंत्र, चिकाटी, संयम आणि पिचवर पाय रोवून खेळणाऱ्या बॅट्समनला आणि वेगाने उत्तम लाईन आणि लेंथवर मारा करणाऱ्या बॉलरला या ट्रॅकने भरभरून दिले. वर नमूद केलेले विक्रम पाहता हीच गोष्ट सिद्ध होते. आमचं भाग्य थोर की आम्ही निदान 20 वर्षे का होईना इथल्या मॅचेस पहाटे ब्रम्हमुहूर्तावर उठून पाहण्याचं भाग्य मिळालं. तेव्हा युट्युब नव्हतं. पहाटेच्या थंड वातावरणात तो 21 इंचाचा टीव्ही, त्यात चॅनल 9चे कॅमेरे, बिल लॉरी, रीची बेनो, टोनी ग्रेग, इयान चपला यांचं सुंदर समालोचन त्या #Golden90s च्या सुखाची परिसीमाच. हे भाग्यआता पुढच्या फ्री हिट आणि सुपर ओव्हरच्या जमान्यातील पिढीला मिळणार नाही आणि त्याची मजाही त्यांना कळणार नाही.

The fastest track in the world, none other than Waca Perth will always be missed
©दर्दी क्रिकेटरसिक ODJ.
लेखाचे स्फूर्तिस्थान: केदार ओक, पुणे

विशेष सूचना: सदर लेखातील संदर्भ हे वेगवेगळ्या स्रोतांतून घेतले आहेत, त्यात काही चुका किंवा तांत्रिक त्रुटी असल्यास त्या निदर्शनास आणून देणे आणि काही रंजक प्रसंग माहिती असल्यास ते जरूर शेयर करावे

Sunday, February 26, 2017

मी रडून पाहिले...
मी दडून पाहिले
मी आडून पाहिले
तुझ्या आठवांना
मी छळून पाहिले
मी वळून पाहिले
मी पळून पाहिले
स्वप्नांना तुझ्या
उराशी घेउन पाहिले
मी भिजून पाहिले
मी निजून पाहिले
तुझ्या प्रेमात
मी थिजून पाहिले
मी विसरून पाहिले
मी हरवून पाहिले
तुझ्या डोळ्यात
मी तरुन पाहिले
मी हसून पाहिले
मी रडून पाहिले
तुझ्या श्वासांना
मी स्मरून पाहिले
मी जगून पाहिले
मी मरून पाहिले
हर त्या क्षणात
मी तुटून पाहिले
मी जळून पाहिले
मी टाळून पाहिले
तुझ्यातच पुन्हा पुन्हा
मी उरून राहिले.

Tuesday, October 11, 2016

कॉफी
@9am, Shivajinagar Stn by Indrayani. Catch u
there. असा मेसेज मित्राला टाकून तो घरातून निघाला. उठायला जरा उशीर झाल्याने, पटापट आवरल. बाहेर पाऊस होता, पहाटे 6 वाजता गडद अंधार होता. मध्येच ढगांचा गडगडाट झाला. तो थोड़ा बावचळला. मनात एक आठवण हलका स्पर्श करून गेली. पण लगेच तो घरातून निघाला आणि अर्ध्यातासात कल्याण स्टेशन गाठलं. 6.35 ला इंद्रायणी आली. Chair car boogie मध्ये आपली सीट शोधली आणि तो बसला. किती वर्षांनी पुण्याला जात होता तो. एक आतुरता होती, त्या शहराची, त्या मित्रांची, त्या दिवसातल्या आठवणीची.
गाड़ी सुटली, बाजुच्या सीटवर अजुन कुणी आलं नव्हतं म्हणून त्याने sack सीटवर ठेवली. अंबरनाथ गेल्यावर अचानक एका बाईचा आवाज ऐकू आला, 'क्या भैया, दो रुपया छुट्टा नही है ? नही है मेमसाब, अभी तो धंदा सुरु हुआ है. मुझे 2 रूपये वापीस चाहिये, तुम धंदा करता है तो छुट्टा रखना तुम्हारा कर्तव्य है. एक तो यह कॉफी कितनी पांचट है, पाणी बिलकुल(भैयाने पांचट शब्द पहिल्यांदा ऐकल्याने ती दाद की शिवी हे समजत नाही). रुकिये, आप बैठिये तो सही, हम आगे किसीसे लेके देदेंगे मेमसाब. मुझे अभी देदो, आप नही आये तो मैं किधर शोध लेते बैठू आपका. तेवढ्यात भैया कुठल्यातरी खिशात हात घालतो आणि 2 रूपये त्याला सापडतात. देखा ना, तुमको देनेकी इच्छा नही थी, इधरसेही करप्शन है, वो अकेला मोदी क्या क्या करेगा? भैया पळ काढतो. ती नाण पर्स मध्ये टाकते. Excuse me, is this ur bag? This is my seat. तो पेपरातून डोकं काढतो आणि बघतो तर काय..... गार्गी.
तो sack वर टाकतो, तिने ह्याच्याकड़े पाहिलेलच नसतं, ती करप्शन केस मधून बाहेर आलेली नसते. ती बसते आणि केस सावरायला लागते. फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, ईयरिंग्स, पावसात भिजलेले ओले केस, गोरया चेहऱ्यावर घामाचे ओघळ, भैयाशी वाद त्यामुळे चीड़चीडे भाव, आणि सानुनासिक परंतु सुस्पष्ट उच्चार. एवढ्या' वर्षांनी अजूनही राष्ट्र भाषेची दुर्दशा आहे लोकांची'. तो पेपरात डोकं घालून तिला ऐकू जाईल अशा बेताने बोलतो. तिला हे वाक्य परिचयाचे असल्याने ती चमकून त्याचा पेपर बाजूला करते. Oh freak, केदार!!! केदार देशपांडे..येस. दोघ काही सेकंद नुसते एकमेकाकड़े पाहत बसतात. पहाटे त्याच्या मनात काही क्षण मनात चमकलेली आठवण!! चक्क त्याच्या समोर. ते पुणे, ते फर्ग्युसन कॉलेज, तेव्हाचे दिवस, आणि गार्गी. फर्ग्युसनच त्या दिवसातील सेन्सेशन. जिच्यावर तिच्याच काय पण कॉलेजमधील बाकी department मधल्या शेकडो मुलांनी आपले दिल तिच्याकरता कुर्बान केली अशी त्याची 'बेस्टी' गार्गी पटवर्धन.
तेव्हाच्या चवळीच्या शेंगेचा आता बर्यापैकी कोबीचा गड्डा झाला होता, कपाळावर चक्क ठिपक्याएवढी काळी टिकली. आणि गळ्यात मंगळसूत्र.
इथे कुठे? पुण्याला जातोयस? (टिपिकल मुलगी. पुण्याच्या गाडीत बसलेल्या माणसाला पुण्याला जातोयस का विचारायच) नाही, दिल्लीला जातोय. तिच्या घार्या डोळ्यांत निखारे पेटतात, तुला सरळ बोलता येत नाहीच का अजुन? तुला तरी हिंदी कुठे येत अजुन? दोघेही मनमुराद हसतात. तू मुंबईत कशी? क्लाइंट मीटिंग होती रेनिसांस पवईला, कल्याणला रात्री मावशीकडे राहिले आणि आता back to pavilion. What about you? (फर्ग्युसनची अमृता खानविलकर हे नाव तिच्या मातृभाषेवरील प्रभुत्वामुळे त्या काळी तिला पडल्याची आठवण त्याच्या मनात येऊन गेली) मित्राचं लग्न आहे कोथरुडला. कूल..जनरल चौकश्या झाल्यावर काही मिनिटे शांतता पसरते. दोघेही अस्वस्थ झालेले असतात, मनात आठवणींचें काहूर थैमान घालत असते.
दोघांना एकमेकांवरुन चिडवणे, गैंग आणि त्याहून प्राचार्य मंडळीमध्ये यांच लपून छपुन लफड चाललय अशा चर्चा, लायब्ररीमध्ये एकत्र काढलेल्या नोट्स, वैशाली, रूपाली, वाड़ेश्वरचा दाक्षिणात्य नाश्ता, नाइटआउटला गारठ्यात कोथरुडच्या अमृततुल्य मध्ये प्यायलेला वाफाळलेला चहा. सिंहगडावरील पीठलं भाकरी, बालगंधर्वला पाहिलेली नाटकं, त्यातील काही प्राज्ञ मराठीतील तिला बाउंसर गेलेले संवाद इत्यादी असंख्य आठवणी उफाळून आल्या. मग घोडं अडलं कुठे? गोष्टी पुढे गेल्या का नाहीत? गोम काय होती नेमकी?
दोघेही वाट बघत राहिले. कुणीतरी पुढाकार घेईल. तिचा इंदिरा गांधी आणि त्याचा राज ठाकरे बाणा असल्याने हे होत नव्हतं. कोण कोणाचा कसा किमान शब्दात कमाल अपमान करू शकत ह्याची अलिखित स्पर्धा दोघात कायम असायची. पण दोघेही खिलाडूवृत्तीने ते स्वीकारायचे. ह्या स्पर्धेत तिसऱ्या कुणाला एंट्री नव्हती. ते त्यांचं विश्व होतं, संवाद तिखट जरी असले तरी त्यात हवाह्वासा गोड़वा होता. तो त्यांच्या मैत्रीचा इसेन्स होता. पण एकमेकांच्या आडमुठ्या स्वभावाने, आणि ईगो मुळे दोघेही शिक्षण झाल्यावर दोन गाड्या वेगळ्या दिशेला जाव्या तसे गेले. हा मुंबईला घरी परत आला. तिने नंबर बदलला. नोकरी धरली आणि एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलाशी लग्न केलं. ह्याच्या घरचे वधूसंशोधनात व्यग्र आहेत आणि हा नोकरीत
लोणावळा येतं .कॉफी? 2 कॉफी देना. या वेळी भैया वेगळा होता. सुट्टे काढून ठेवतो नाहीतर परत करप्शनवर भाषण ऐकायला मिळेल. How rude. U know...म्हणूनच मी तुला विचारलं नाही. ती पटकन बोलून गेली. तुला माझ माकड़ करता आलं नसतं म्हणून दुसरं काय? घार्या डोळ्यांत परत निखारे पेटतात. कुचका मेला!! पुण्यात किती दिवस आहेस? उद्या संध्याकाळी इंद्रायणीने परत. नंबर दे address whatsapp करते. Tomorrow's morning coffee at my place. विचारत नाही सांगतेय. 9am sharp. लेट झालास तर परत दूध गरम करणार नाही मी आधीच सांगते. काहीवेळ परत शांतता. खड़की आल्यावर दोघांची एकमेकांच्या माणसांशी फोनफोनी होते. शिवाजीनगर येतं. ती विचारते कॉफी? फटाफट? आता दोघांकड़ेही सुट्टे नाहीयेत सो मी आज जमा करतो तसेही उद्या तुला द्यावेच लागतील की कॉफीचे. दोघेही मनमुराद हसतात आणि एकमेकांचा निरोप घेतात
©ODJ

Tuesday, August 26, 2014

किल्ले राजमाची- एक अविस्मार्णीय अनुभव

पावसाळा म्हणलं की ट्रेकिंग साठी आदर्श काळ. कॉलेज मध्ये असताना ट्रेकिंग चा भरपूर आनंद लुटायला मिळत होता. पण नोकरीच्या रहाटगाडग्यात रविवार हा हक्काच्या झोपेचा वार झाल्याने 'ट्रेक्स' या गोष्टीपासून जवळपास ३ वर्षे दुरावा निर्माण झाला होता. आजूबाजूचे मित्र बर्याचदा ट्रेक्सला जायचे, सुरुवातीला २-३ वेळा बोलावले पण माझी नकारघंटा कायम राहिल्याने बोलावणे हळूहळू बंद झाले. तरीही एखादा ट्रेक करायचा कित्येक दिवसांपासून मनात होते आणि निमित्त झाले नितीश बापटने आयोजित केलेल्या २३-२४ ऑगस्टला 'किल्ले राजमाची' चे. राजमाची हे ट्रेकर्सचे पावसाळ्यातील एक  आवडते ठिकाण.  मुळात नितीश बापट हा अत्यंत passionate ट्रेकर म्हणून सुप्रसिद्ध आहे, त्याच्या या passion ची मटा सारख्या पेपरने मागील वर्षी दखल घेतली. त्यामुळे त्याच्याबरोबर एक ट्रेक करायची इच्छा मनात होती. तसेच आमच्या खास Galaxians ग्रुप(हर्षद नवाथे, निखील दुराफे, बापट बंधू ) इतर सदस्यही या ट्रेक ला येणार असल्याने अजूनच उत्साहात भर पडली. साधारण ३ वर्षाने ट्रेक करत असल्याने काहीही सामान माझ्याकडे नव्हते. अगदी 'ट्रेकिंग शूज', टी शर्टस इत्यादी गोष्टींची खरेदी करण्यापासून तयारी होती. ती मी कशीबशी केली आणि ट्रेकला जाण्यास सज्ज झालो.

साधारण ७ च्या सुमारास आम्ही सर्व डोंबिवली स्टेशनला भेटलो. एकूण १८ जण या ट्रेकला येणार होते. त्यातील काही लोकांशी माझी ओळख असल्याने परिचयाचा अडसर आला नाही. तसेच आमचे पुण्याचे दोस्त नचिकेत पुरोहीत हेही येणार कळल्याने आनंदात भर पडली. ७.०८ च्या कर्जत लोकल ने आम्ही कर्जत गाठले. १५-२० मिनिटे चहा नाश्ता केला. आणि साधारण ८.४५ च्या सुमारास डेक्कन एक्स्प्रेस कर्जतला आली. त्यात आम्ही शिरलो. मी आणि हर्षदने गाडीच्या दरवाज्यात ठाण मांडले व लोणावळा येईपर्यंत मनसोक्त जुनी हिंदी गाणी गायलो. साधारण ९.४५ च्या सुमारास डेक्कनने लोणावळा गाठले. लोणावळ्यात एका हॉटेलात नाश्ता झाल्यावर आम्ही किल्ले राजमाचीच्या मार्गाला कूच केले

लोणावळ्यातील तुंगार्ली गावातून किल्ले राजमाचीकडे रस्ता जातो. सुरुवातीला डांबरी रस्ता नंतर किंचीत कच्च्या मातीचा अशाप्रकारे कोणतीही अवघड patch नसलेला रस्ता होता. मध्ये एका धबधब्यावर भिजण्याचा आनंदही आम्ही घेतला. खूप दिवसांनी T shirt, trackpant, hevay Sack, Trekking shoes इत्यादी घेऊन चालताना एक वेगळंच फिलिंग येत होतं. २ तास मजल दरमजल करत आम्ही थोड्या उंच पठारावर दुपारच्या जेवणाकरता थांबलो. ती जागा अत्यंत नयनरम्य होती. समोर धबधब्यावर एक ग्रुप  Waterfall rapelling करत होता. एका बाजूला हिरव्यागार गवताची जणू दुलईच पसरली होती. तिथे आम्ही सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. जेवण झाल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. साधारण २.३०-३ तास चालल्यावर राजमाची गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. जिथे आम्ही त्या रात्री वास्तव्य करणार होतो त्या गावाला 'उधेवाडी' असे म्हणतात. पुणे वनविभाग या भागात ५ रुपये प्रवेशशुल्क घेते. तिथून आत गेल्यावर एका नयनरम्य पोइंट वर आम्ही थोडावेळ विसावा घेतला. तिथे लिंबू सरबताचा आस्वाद घेतला. तिथून पुढे मजल दरमजल करत उधेवाडी मध्ये 'श्री वरे' यांच्या घरी पोहचलो जिथे आमच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्या घरात आम्ही सामान ठेवले. श्री वरे यांनी कांदेपोहे व चहा दिला. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर नितीशने उधेवाडीतील एका ऐतिहासिक मंदिर व तळे बघायला जायचा बेत आखला. आम्ही तळयापाशी पोचलो व तिथे काही मंडळी पोहायचा आनंद घेत असताना आम्ही पाहिले. दिवसभर पावसाने दगा दिल्याने उन्हाच्या काहीलीतून  साधारण ४-५ तास चालून चालून क्षीण आला होता, तो क्षीण दूर करण्यासाठी आम्ही त्या तळ्यात पोहायला जायचे ठरवले. सुदैवाने तळे फारसे खोल नसल्याने पोहता न येणाऱ्या मंडळीना मनसोक्त पोहायचा व थंडगार पाण्यात मजा करण्याचा आनंद घेता आला. पोहून बाहेर आल्यावर एकदम ताजेतवाने वाटले. तो पर्यंत तिथे किर्र अंधार झाला होता. तिथून आम्ही 'श्री वरे' यांच्या घरी गेलो तिथे जाऊन कपडे वगैरे बदलून फ्रेश झालो. उधेवाडी समुद्रसपाटीपासून साधारण २००० फुट उंचीवर आहे. आश्चर्य म्हणजे त्या गावात वीज नाही. सौरउर्जेवर चालणार्या एका दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात आम्ही बसलो. नचिकेत,प्राची, सचिन, सर्वेश, पार्थ  इत्यादी मंडळी पत्ते कुटण्यात दंग झाली. इथे मी हर्षद, निखील, नितीश, अनघा, आकांक्षा, दीपाली  ह्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. हर्षद, नितीश ने विनोद, शाब्दिक कोट्या-कोपरखळ्या मारून सर्वांची हसून हसून पुरेवाट केली. साधारण रात्री ९ वाजता जेवण आले. आमटी भात, दोन भाज्या, लोणचे, कोशिंबीर, आणि दही असा साधा पण चविष्ट मेनू होता. रात्री वातावरणही कमालीचे गार झाले होते. त्या अंधारात आणि गारव्यात जेवताना एक वेगळीच मजा आली. जेवण झाल्यावर परत गप्पा मारल्या तसेच आकांक्षा आणि मी एक गाणे सुद्धा म्हणले. साधारण ११.३०-१२ च्या सुमारास झोपायचे ठरले. कर्णधार नितीशने सर्वांना सकाळी ६ वाजता उठायची सूचना केली. आणि आम्ही झोपी गेलो

कर्णधार नितीशच्या आज्ञेनुसार आम्ही ६ वाजता उठलो. सर्व नैसर्गिक विधी आटपून 'मनोरंजन' गडाकडे कूच करायला निघालो. साधारण तासाभरात मनोरंजन गडावर आम्ही पोचलो. एकूणच राजमाचीच्या आजूबाजूच्या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान आहे. पावसाळ्यात या निसर्गाला 'हिरव्यागार मुकुटाचा' साजच बहाल होतो आणि डोळ्यांचे पारणे फिटते, बघणारा तृप्त होऊन जातो. पठारावर हिरव्या रंगाच्याच वेगवेगळ्या shades चे मनोभावी दृश्य पाहायला मिळते. मनोरंजन पाहून झाल्यावर साधारण ९-९.३० च्या सुमारास आम्ही परत उधेवाडीत आलो. तिथे वरे यांनी कांदेपोह्याचा नाश्ता व चहा दिला. थोडावेळ विसावा घेऊन कप्तान नितीशने प्रस्तावित दुसरा गड म्हणजे 'श्रीवर्धन' गडावर कूच करायचा आदेश दिला व आम्ही मार्गस्थ झालो. मनोरंजन गडाच्या मानाने श्रीवर्धन ची वाट सोपी नव्हती, अनेक चढ उतार पार करावे लागले. आदल्या दिवशी प्रमाणे वरुणराजाची अवकृपा दुसर्या दिवशीही कायम होती (याचे खापर कृपाने निखीलने ट्रेकच्या सुरवातीला केलेल्या भाकीतावर फोडले) तसेच उन्हाचा तडाखाही कायम होता, घाम निघत होता. साधारण १.३० तासात आम्ही 'श्रीवर्धन' वर पोहचलो. आमचे ध्येय साध्य झाले होते. संतोष ने 'शिवकल्याण राजा' मधील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करणारी आरोळी दिली व सर्वांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. श्रीवर्धन करून पुन्हा आम्ही १.३० च्या सुमारास उधेवाडीत आलो. २ गड करून पुरत घामट निघाल्याने परत तळ्यावर पोहायचा बेत आखला गेला. १५-२० मिनिटाची वेळमर्यादा कप्तान नितीशने त्यासाठी दिली. परत मनसोक्त पोहून झाल्यावर आम्ही वरेंच्या घरी परतलो. तिथे दुपारचे जेवण घेतले. मटकीची उसळ, कोबीची भाजी, भाकऱ्या, लोणचे, भात-आमटी असा सुग्रास फक्कड बेत होता. अशा चविष्ट जेवणावर मनसोक्त ताव मारल्यावर आपापले सामान आवरून बेगा भरायचे आदेश नितीशने सर्वांना दिले. अर्धातास आवराआवर तसेच packing मध्ये गेला आणि सर्व परतीच्या मार्गाला निघायला  सज्ज झालो.

साधरण २.३० च्या सुमारास उधेवाडीला आम्ही 'जय महाराष्ट्र' केला, आणि परतीच्या वाटेला लागलो. यावेळी आमचे लक्ष्य लोणावळा नसून कर्जत हे होते. परतीचा मार्ग हा बऱ्यापैकी खडतर असा होता. लांब अंतर, मोठेमोठे उतार, त्यावर शेवाळे साचलेले, वेडेवाकडे ओबढ धोबड खडक, काही अवघड patches अशा आव्हानांनी भरून असा लांब मार्ग होता. आणि वातावरणातील भयंकर उष्मा हा अजून त्रासात भर घालत होता. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. उतरताना काही मंडळीना त्रास झाला, थकवा जाणवला. तरीपण एकमेकांना मदत करत, सांभाळून घेऊन हा खडतर मार्ग पार केला. साधारण ६.१५ च्या सुमारास पूर्ण डोंगर उतरून कर्जत जवळील 'कोंडाणे' गावापाशी आम्ही पोहचलो. तिथून आम्ही २ टमटम केल्या. आणि दोन गटात विभागून बसलो. मी बसलेल्या 'टमटम' मध्ये पुष्कर,नचिकेत,सचिन,बापट बंधू आणि दीपाली होतो. साधारण अर्धा तास जुन्या नव्या मराठी हिंदी गाण्याची मस्त मैफिलच आम्ही सर्वांनी रंगवली. पुष्करने अप्रतिमरित्या गायलेल्या बाबूजींच्या  'तोच चंद्रमा नभात' ला सर्वांनी भरभरून दाद दिली. गाणी म्हणता म्हणता कर्जत स्टेशन कधी आले हे कळलेच नाही. टमटम मधून बाहेर पाउल टाकतो रे टाकतो तोच पावसाचे आगमन झाले आणि तुफान चालू झाले. धावत आम्ही कर्जत स्टेशनच्या फलाटावर पोहचलो. ७.०० ची मुंबई ला जाणारी लोकल धरली. लोकल मध्येही नितीशने गप्पांच्या फडाचा ताबा घेत त्याच्या खास शैलीत विनोदांची खैरात करवून सर्वांना पुरेपूर हसवले. ८ वाजता डोंबिवली स्टेशन वर आम्ही उतरलो. हसऱ्या चेहऱ्याने एकमेकांचे अभिनंदन केले  व पुढील ट्रेक असेच जोशात जोमात करायचे असा मानस व्यक्त करून एकमेकांचा निरोप घेतला.             
      
टमटम