Friday, July 5, 2019

मामाची आजी..

ए बाळा, उठ!! "तिन्हीसांजेला झोपू नये, लक्ष्मीचा वास यावेळी असतो". तिन्हीसांज हा शब्द पहिल्यांदा कानी पडला तो तिच्यामुळे. अर्थात तिच्यामुळे नंतर शब्दसंग्रहात जी भर पडली त्याबद्दल मी आजन्म ऋणी आहेच. अशारितीने तिन्हीसांजेला झोपू नये, हा संस्कार अंगवळणी पडला. मग हातपाय तोंड धुवून होईपर्यंत देवापुढे निरांजन आणि उदबत्ती लावून पाट ठेवले जायचे, मग ती, आजोबा, आणि जो कुणी नातू हजर असेल त्याला शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते म्हणणे सक्तीचे होते. त्याशिवाय रात्रीचे जेवणाचे पान मिळायचे नाही. वास्तविक ती माझी नुसती आजी नव्हती. वास्तविक ती माझ्या आईची आई, पण मी तिला 'मामाची आजी' म्हणायचो. मोठे झाल्यावर हीच सवय रूढ झाली

प्रभू श्रीरामचंद्रावर तिची निस्सीम श्रद्धा. 'नमस्कार करते रे रामराया, चुकले असेन तर अपराध पोटात घे रे रामराया' अशी वाक्ये सर्रास कानी पडायची.
"माता रामो मत्पिता रामचन्द्रः, स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः, सर्वस्वं मे रामचन्द्रो दयलुर्नान्यं,
जाने नैव जाने न जाने" ही रामरक्षेतील तिची आवडती वचनं. मी गमतीत कायम म्हणायचो, भाजपने राममंदिर मुद्द्यावर प्रचारक म्हणून हिला घ्यायला हवं,  नक्की फायदा झाला असता. रामरक्षा पाठ असणं हे तिच्यासाठी पाढे, इंग्लिश अल्फाबेट्स येण्याइतक आवश्यक होतं. तिची मुलं, सून, जावई, नातवंड, भाचे पुतणे गॅंग, शेजारी दिसेल त्या सर्वांना रामरक्षा पाठ करायला सांगयला कमी केलं नाही. मला तर पाटावर बसवून, हात जोड, म्हण, 'अस्यश्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य, बुधकौशिकऋषी:' मग एका स्वरात, एका लयीत रामरक्षेचे सामूहिक पठण व्हायचे. चुकीचे उच्चार हे तिला अजिबात खपायचे नाहीत, जरा काही इकडंच तिकडे झालं, की ते पूर्ण वचन नंतर 10 वेळा घोटवून घ्यायची. श्रीरामाला 2 वेळा नैवैद्य दाखवल्याशिवाय अन्नाचा कण तिच्या पोटात गेला नाही. माझा रामराया जेवल्याशिवाय मी कशी जेवणार, हे वाक्य मला अजूनही आठवतं

स्वतः शिक्षिका असल्याने प्रचंड शिस्तप्रिय आयुष्य तिचे होते. वेळच्या वेळी उठणे, जेवणं, अभ्यास, खेळणं, झोप इत्यादी गोष्टी झाल्या पाहिजेत हा आग्रह. तळणीचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ त्यात मुरांबा मग एका बरणीत कैरीचा, एकात अननस, एकात तोतापुरी आंब्याचा अशी चंगळ होती. कैरी, लिंबू, आवळा अजून सतराशे साठ प्रकारची लोणची, तसेच लसूण, जवस, कारळं (कारलं नव्हे ते वेगळं) ह्याच्या चटण्या असा बेडेकर गृहउद्योग दुकानात असलेला जवळपास सर्व स्टॉक घरी असायचा. पोळीशी तोंडी लावायला खायचे काय हा प्रश्न कधी तिच्या हयातीत पडला नाही. मीठ आणि लाल तिखट हे जिन्नस चव आणण्यापुरतेच प्रमाणात घालावेत, पदार्थ अळणी किंवा अतिमसालेदार नसावे. सात्विक आहाराकडे तिचा कल होता.

स्वयंपाक करताना गाणी म्हणायला तिला फार आवड. फडके, हृदयनाथ, लताबाई, आशाबाई, सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांच्या ओळी सतत तोंडी. आनंदघन म्हणजे लताबाईंचं 'राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग, गडनी सजनी गडनी सजनी गं' हे तिचं आवडतं गाणं असावं, बऱ्याचदा तिच्या विशिष्ट स्वरात खूपदा हे ऐकू येई. कधी विळीवर भाजी चिरताना बोट कापलं, किंवा पोळ्या करताना हाताला गरम तवा लागला तर तिथेही 'रागावलास का रे रामराया?' हे उद्गार निघत. तिने जे जे काही स्वतः करून पानात वाढले, ते कधीच बेचव लागले नाही. नंतर हवं तर घेऊ नका पण पानात वाढलेलं कधीही टाकायचं नाही हा कटाक्ष तिचा असे. टाकणं म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान. तिच्यालेखी हा अजामीनपात्र गुन्हा असे. जेवायला सुरुवात करायची आधी 'वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे..सुरू करून जय जय रघुवीर समर्थ' म्हणल्याशिवाय जेवण सुरू झाले नाही. हल्ली एलईडी टीव्ही समोर असल्या शिवाय जेवणं सुरू होत नाहीत. टेबलवर बसून जेवणे ही आंग्लप्रथा तिला पटली नाही. मांडी घालून खाली चित्रावती घालूनच जेवायला बसण्याकडे तिचा दंडक होता

गुरुवार, शनिवार, संकष्टी, चंपाषष्ठी, हरतालिका, एकादशी अश्या अनंत उपवासांची जंत्री असलेली तिची वेगळी दिनदर्शिका होती. हे उपवास स्वार्थी हेतूने नसून फक्त तिच्या श्रद्धेपोटी करायची. तिचा उपवास हा खरा उपवास होता. उपवासाच्या नावाखाली साबुदाणा, वरीच्या पदार्थांचे, ज्यूस, राजगिरा लाडू, बटाट्याचा चिवडा असे चेंज ऑफ डायटचा भंपकपणा तिने केला नाही. फक्त पाणी पिऊन, अन्नग्रहण न करता नेटाने ती करायची. त्या त्या उपवासाच्या दिवशी त्या त्या देवळात जाऊन यायची. तिथे भजन कीर्तन असेल तर आवडीने ऐकायला बसायची. रामनवमीच्या दिवशी तरी विशेष आनंदी असायची. पहाटे उठून रामरक्षा म्हणल्यावर, सकाळी आवरता आवरता गदिमा आणि बाबूजींनी अजरामर केलेलं गीत रामायणाच्या कॅसेट्स आदल्या दिवशी शोधून त्या दिवशी बरोबर टेपरेकॉर्डरवर लावायची.  बाबूजींनी श्रीराम श्रीराम श्रीराम..असे म्हणून स्वये श्रीरामप्रभु ऐकती सुरू व्हायचे ते थेट त्याचा शेवट साधारण श्रीराम...ह्या रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण ह्या गाण्यातील सादेने व्हायचा.

ज्या काळात क्रिकेट फक्त पुरुष कोचावर तंगड्या पसरून बघताना बायका नाकं मुरडून आतल्या खोलीत जायच्या, त्या काळात ही घरातील समस्त पुरुषांसोबत टीव्हीसमोर बसून मॅच पाहायची. मॅचची वेळ आधीच पाहून त्यानुसार ती कामं आटपून घ्यायची. डीआरएस तंत्रज्ञान नसताना सुद्धा बॅट्समन लेग बिफोर आहे की नाही याचा अंदाज तिचा बऱ्याचदा खरा निघायचा. पिच आउटसाईड द लेग स्टंप आहे ओंकार, ह्याच्या बापसाने आउट दिलंय का? यांना मारायची घाई का असते, जरा म्हणून अंगी संयम नाही, तो सचिन एकटा काय करेल. केवढंस ते पोर, किती भार सोसेल?  पाकिस्तान संघावर तिचा फार राग. पाकडे हा तिचा परवलीचा शब्द. हाण रे सच्या त्या अक्रमला, कुंबळे उडव रे दांडी त्या बटाट्याची, हा अनवर मेला हलकट लेकाचा आउट होत नाही लवकर इत्यादी असे अनेक संवाद कुणा आजीच्या तोंडी ऐकलेला, तसेच त्यापुढे जाऊन आजीसोबत घरात क्रिकेट खेळायचे दुर्मिळ भाग्य असलेला कदाचित की एकमेव नातू असेन. पाकिस्तानशी मॅच शुक्रवारी असेल तर त्यांना तो लकी असतो ही महत्वाची गोष्ट सर्वप्रथम तिच्याकडूनच मी ऐकली.

ज्या काळात बायका अर्थार्जन करायला बाहेर पडत नव्हत्या त्या काळात एका खेडवळ भागातील शाळेत शिक्षिकेची नोकरी जवळपास तीन दशके तिने केली. तेही तीन मुलांना सांभाळून. त्यांचे दप्तर, डबे, पुस्तकं, सकाळचा स्वयंपाक, कपडे, भांडी, केरकचरा इत्यादी अनेक आव्हानं पार करून, डोंबिवलीला गाडी पकडून ती सकाळी 7 ला शाळेत पोहचायची. त्या काळात गाड्यांची उपलब्धता आजच्या इतकी नव्हती. एक लोकल चुकली की एक तासाने पुढची लोकल असे. निवृत्त झाल्यावर तिने वानप्रस्थाश्रमात उपासना करता करता अनेक छंद तिने जोपासले. मुलांच्या लग्नाची जबाबदारी पार पडल्यावर तिने जवळपास पूर्ण भारत पालथा घातला. काश्मीर ते कन्याकुमारी ती मनसोक्त फिरली. तिला प्रत्येक ठिकाणचे प्रवासवर्णन लिहायचा छंद होता. त्याची काही टिपणं आजही माझ्या संग्रही आहेत.

तिच्या पदरात आलेल्या सर्व नातवांचा तिने अतिशय मायेने सांभाळ केला, त्यांच्यासोबत ती लहान झाली. घास भरवताना एक होता काऊ, एक होती चिऊची गोष्ट असुदे, किंवा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..ऐकल्याशिवाय मी तर कधीच झोपलो नाही ही आठवण आमच्या मातोश्री कायम सांगतात. आपल्या हाती लागलेलं पोर संस्काररुपी साबणाने चापून चोपून लक्ख करून जगात पाठवायचे हे एकमेव ध्येय तिचे होते. बाकी भावंडांपेक्षा जास्त सहवास तिचा मला लाभला.

माझं पहिलं टया ते नोकरीचे पहिले वर्ष ही मजल तिने बघितली. खासकरून माझ्यासारख्या वांड मुलाला तिने ज्याप्रकारे सांभाळले त्यासाठी तिचे डोंबिवलीच्या रामनगर परिसरातील चौकाचौकात कौतुकाचे होर्डिंग, फ्लेक्स लावावे असा मानस मामामंडळींचा होता. तिची अभ्यास घेण्याची स्वतंत्र पद्धत होती. छडी लागे छम छम वर तिचा विश्वास कधीच नव्हता. मारण्याने मुलं कोडगी होतात असे तिचे ठाम मत. अबोला धरणे हे तिचे ब्रह्मस्त्र होते. तिचा अबोला टाळण्यासाठी घरात कुणीही तिला आवडत नाही असे वागले नाहीत. घरात आलेल्या सर्व पाहुण्यांना शक्यतो जेऊच घालून पण ते शक्य नसल्यास हातावर काहीतरी दिल्याशिवाय जाऊ तिने दिले नाही. प्रत्येकाचा आनंदाने आणि आपलेपणाने पाहुणचार केला

आज आयपॅड हातात घेऊन स्कैप, गुगल ड्युओ किंवा तत्सम साधन वापरून नातवाशी संवाद साधणाऱ्या आजी पाहिल्या की त्या नातवांची कीव येते. स्वतःच्या हाताने केलेला रवा बेसनाचे लाडू, पोह्याचा चिवडा घरी त्या आयपॅड मधून दाखवून तू आलास की देईन असे म्हणताना अशा एका आजीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर डोळ्यांतून पाणी तरळताना बघून मन हेलावलं आणि माझे बालपण आठवल, तिच्यावर काहीसं लिहावसं वाटलं. लिहायला गेलं तर पुस्तक सुद्धा लिहू शकेन पण कुठेतरी अनावर होऊन थांबलो लिहिता लिहिता परत एकदा लहान झालो, त्या #Golden90s च्या काळात गेलो. ती आज माझ्यापाशी नाही पण मला लहान करायचे सामर्थ्य ह्या तिच्या आठवणींशिवाय दुसऱ्या कशातही नाही.

©नशीबवान नातू ODJ

No comments:

Post a Comment