Sunday, April 19, 2020

माई

नातं निर्माण व्हायला काही कारण लागत नाही. माझ्या मते ‘व्हेवलेंथ’ ही गोष्ट त्याकरता पुरेशी आहे. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या नात्याचं काही बारसं करताच येत नाही. कारण ती रक्ताची नसतात. रक्तापलीकडे असलेल्या पण त्याची वीण रक्ताच्या नात्याएवढी घट्ट असलेल्या नात्याला नाव आपल्याला देत येत नाही. हे असं बेनामी नातं मात्र मायेचा प्रेमाचा एक सुंदर सुगंध देतं, जो दिसत नाही पण त्याचा फील नक्कीच येतो.
जन्मल्यापासून चित्पावन ब्राम्हण समाजाशी आणि पुणे शहराशी माझं एक विशेष नातं आहे. वास्तविक या शहराशी आणि चित्पावन मंडळींशी जोडलेली नाळ अजूनही कायम आहे पंचवीस एक वर्षांपूर्वी जेव्हा शाळकरी मित्र उन्हाळी सुट्टीत कोकणात जायचे, पण मी एकटाच इसम असायचो जो पुण्यात जाई.
नातेवाईक मंडळींकडे राहून वगैरे आलं की एक चक्कर व्हायची ती जगप्रसिद्ध अशा पुण्यातील बर्म्युडा ट्रायंगल असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठ या भागात. त्यातील सदाशिव पेठ ही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणल्यास वावगं ठरू नये. पुलंनी म्हणल्याप्रमाणे एखाद्या सुरकुत्यानी फुललेल्या म्हातारीने भरतनाट्यमची पोज घेऊन उभे राहावे तशी दिसणारी काही घरं पुण्यात होती. तसंच काहीसं ‘गोखले’ कुटुंबाच्या घराची इमारत. अरुंद जिन्यातून तीन मजले खाली वर केल्यावर माणूस सिंहगड चढायला कुरकुरणार नाही.
मंजुषा उर्फ माई गोखले ही बाई 70च्या पुढे असली काही थकलेली, कमरेत वाकलेली अजिबात नव्हती. अतिशय गृहकर्तव्यदक्ष, काटेकोर, शिस्तप्रिय आणि तोंडाने फटकळ होती. घारे डोळे, गोरीपान कांती, सडपातळ अशी ती सतत टवटवीत आणि कायम काहीना काही उद्योगात गुंतलेली असायची. विश्रांती ही गोष्ट फक्त शारीरिक गरज म्हणून तिच्यासाठी होती. मनाला ते मान्य नव्हतं. तोंडाचा पट्टा हा अखंड सुरू असायचा. घरात कुणी असलं तर त्याच्याशी बोल नाहीतर घरात काम करताना एकटं बडबडणे किंवा काहीतरी सतत गुणगुणत बसायची. गप्प बसून काही करणे हे तिच्यासाठी निषिद्ध असावं.
माईचे यजमान केशवराव उर्फ अण्णा गोखले हे थोडे विरुद्ध पठडीतील. एकरांती चित्पावन असून सुद्धा देशस्थ ऋग्वेदी कुळाच्या जवळ जाणारा स्वभाव. मृदू बोलणे, वेंधळेपणा हा त्यांचा स्थायी भाव. घरात यावरून माई आणि त्यांचे प्रेमाचे संभाषण सतत सुरू असायचे. “त्या मंडईतला भाजीवाल्याला आपण काय दत्तक घेतले का हो? 3 रुपये किलो बटाटा असताना तुम्ही 5 रुपये त्याला देऊन आलात. आपल्या पूर्वजांनी मनीप्लांटच लावलाय हो अंगणात, त्याचा वेल वाढून आपल्या खिडकीतून आत आल्यासारखे तुम्ही पैसे उधळताय”. वैकुंठाला जाताना चार पैसे हाताशी असुद्या नाहीतर डायरेक्ट ओंकारेश्वरलाच न्यावे लागेल”.
20 22 वर्षांपूर्वी आमच्या वडिलांसोबत त्यांच्याकडे गेलो असताना अथर्वशीर्ष म्हणून दाखव अशी दमदार आज्ञा माईकडून आली. वडिलांच्या शिकवणीचा कस लागण्याची पहिलीच वेळ कदाचित आल्याने, आता हा काय म्हणतोय या टेन्शनने भर डिसेम्बर महिन्यात त्यांच्या कपाळावरून ओघळणारा घामाचा थेंब अजूनही आठवतोय. सुदैवाने मी व्यवस्थितपणे अथर्वशीर्ष म्हणून दाखवले आणि गोखले कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव उमटले. बिदागी म्हणून आजोबांनी दिलेले 11 रुपये आणि उच्चार अगदी स्पष्ट आणि शुद्ध हो लेकाचे तुझ्या दिलीप असं म्हणत माईंनी दिलेली चितळेची आंबा बर्फी अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्या 11 रुपयांच्या बिदागीचे मोल माझ्यासाठी हल्लीच्या भाषेत वर्थ मिलियन डॉलरस होते.
सत्यनारायण पूजेला गव्हाऐवजी तांदूळ मांडले तरी चालतात हा साक्षात्कार माईमुळे झाला. आमच्या कोकणात तांदूळ पिकतो, तुझ्या देशावर गहू म्हणून तुम्ही गहू तर आम्ही तांदूळ ठेवतो इतकं स्पष्ट विवेचन तिने केलं. कुळीथ नावाचा खाद्यपदार्थ असतो हे मला माईने मला वयाच्या 16 व्या वर्षी दाखवले. चणाडाळी ऐवजी पिठलं हा पदार्थ कुळथापासून सुद्धा बनतो हे मला नव्याने कळले.
फणसातील अठळी ही फक्त गरे खाऊन कचऱ्यात टाकायला देवाने निर्माण केलेली नाही असे माईचे वाक्य मला आजही आठवते. त्यानंतर मी अठळी कचऱ्यात आजतागायत टाकायची हिंमत केलेली नाही. सुपारीचे तुकडे हे विळी किंवा सुरीने चिरून होत नाहीत तर त्यासाठी अडकित्ता नावाचं शस्त्र मी पेठेतील या गोखल्यांच्या घरातील एका पेटीत सन्मानाने ठेवलेलं पहिल्यांदा पहिलं. मीठ लावून उन्हात गरम केलेल्या जांभळाची अवीट चव मी प्रथम माईमुळे अनुभवली.
तांदळाची सालपापडी नावाचा प्रकार मी तिच्या हातचा पहिल्यांदा खाल्ला. माईकडे उदरभरण करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. बाहेरच्या तिखट आणि चमचमीत खाण्याची सवय असलेल्या मला माईच्या पद्धतीच्या अशा तुलनेने अळणी आणि सपक स्वयंपाकाशी जुळवून घेणे जड जायचे. अर्धी बरणी तिखट नरड्यात घातलं की जेवण जात नाही का तुला ओंकारा. मिरचीचा व्यापार करणाऱ्याचीच मुलगी आण हो. घालील तुला दिवसरात्र मिरच्या खायला.
हल्लीच्या जमान्यात पौष्टिक पण नॉन ग्लॅमरस सदरात गणल्या जाणाऱ्या भाज्या हमखास मंडईतुन ती आणायची. लाल माठ, दोडका, शेपू, भोपळा, अंबाडी, सुरण वगैरे मला न आवडणाऱ्या भाज्या हमखास ती माझे आगमन झाल्यावरच घेऊन यायची. माईपुढे माझा आवाज चालत नाही हे ओळखून कदाचित मातोश्री तिच्याशी मुद्दाम संगनमत करून ह्या भाज्या माझ्या नरड्यात कोंबायचा प्लॅन बनवत असावी असा संशय मला कायम येई.
(क्रमशः) #MaaiGokhale
लेख मोठा होत असल्याने कंटाळवाणा होऊ नये म्हणून या भागावरील वाचकांच्या प्रतिक्रिया पाहूनच पुढील भाग पोस्ट केला जाईल.
©ODJ

No comments:

Post a Comment