Sunday, April 19, 2020

माई (भाग 2)
रत्नागिरी जिल्ह्याचा आत्मा, हुजूरपागा मुलींच्या शाळेतील शिक्षण आणि एकूणच त्या 'पूर्वीचे पुणे राहिले नाही' असे सतत म्हणणाऱ्या पिढीचे वंशपरंपरागत चालत आलेले संस्कार म्हणजे माई. तिच्याकडे जायचे म्हणजे कधीही जाऊन चालायचे नाही. घराबाहेर कधी यावे आणि जावे अशी पाटी जरी लिहिलेली नसली तर काही अलिखित दंडक होते.
दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी 8 नंतर उगाच कुणी घरी आलेलं तिला विशेष आवडत नसे. रात्रीचे जागरण ही गोष्ट तिच्यासाठी अब्रम्हण्यम सदरातील होती. रात्रीची वेळ ही भुतं, पिशाच्च यांच्या कामकाजाची असते आपण माणसं आहोत आपल्याला जागे राहायच्या वेळा आखून दिलेल्या आहेत असे तिचे मत होते. लवकर निजे लवकर उठे... या उक्तीला माई आयुष्यभर जागली.
एकदा तिच्याकडे मुक्कामी असताना सकाळी 9 वाजता मी उठलो यावरून तुम्ही मुंबईकर म्हणजे एक नंबरचे आळशी, कोवळं ऊन अंगावर आल्यावर तुम्हाला जाग येत नाही, पार्श्वभाग चटक्यांनी लाल झाला की तुमचे डोळे उघडणार. त्यावर मी एवढ्या पहाटे उठून कुठे सत्यनारायण करायचा एवढंच म्हणलं, तर म्हणे तेव्हा तरी पहाटे उठता की त्या सत्यनारायणाच्या दुपारच्या झोपेची वेळ झाल्यावर कथा वाचायला घेता? असा युक्तिवाद व्हायचा.
डोंबिवलीकर मंडळींची एक खासियत आहे ती म्हणजे डोक्यावर पंखा सुरू असलेला दिसल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ती आमची डोंबिवलीची भाची प्राजक्ता, तुझीच बहीण, बाहेर बर्फ जरी पडत असला तरी अंगात 4 स्वेटर घालून, एक पांघरूण आणि ब्लॅंकेट घेईल पण पंखा 1 वर तरी चालू ठेऊनच झोपेल. हे माझे नव्हे तर तिचे observation. बऱ्याच अंशी ते खरेही आहे. पंखा ही फक्त मार्च ते मे हे तीनच महिने लागतो असे तिचे प्रांजळ मत. पण उन्हाळा आणि पावसाळा असे दोनच ऋतू माहिती असलेल्या डोंबिवलीकरास अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत त्या निवाऱ्यात पंखा ही एक मूलभूत गरज आहे हे तिला कधी पटले नाही.
पुण्याच्या पलीकडे त्याहूनही पंधरा वीस पेठांच्या बाहेर रम्य आकर्षक असं जगात काही असू शकत यावर तिचा विश्वास नव्हता. लकडी पुलाच्या पलीकडे असलेलं पुणं म्हणजे टॉवरमध्ये गुप्तपणे राहणाऱ्या निर्वासित पांढरपेशा मंडळींचा रेफ्युजी कॅम्प. नुसतं पत्त्यापुढे ४११ च्या कोणतेही तीन आकडे खरडले म्हणजे पुणेकर झालो आपण असे प्रत्येक माणूस समजतो हे तिचे मत.आज हॅपनिंग मानल्या जाणाऱ्या 'कोथरूड' या भागाचे पुण्याच्या भौगोलिक क्षेत्रामधले अस्तित्व तिने साधारण एक दशक ओलांडल्यावर मान्य केले
कोकणात तिची वडिलोपार्जित जमीन होती, लाल माती, ते शेणाने सारवलेल्या जमिनीचे घर, माडी,पडवी, ओसरी, तुळशीवृंदावन, अंगणात हापूस वगैरे टिपिकल सगळं होतं पण त्या सगळ्यावर अनेक भावंडांचे दावे होते. बरं बालपण पुण्यात गेल्याने तिला तिथली विशेष ओढही नव्हती वा तिटकाराही नव्हता. तिला तिथल्या मातीशी जिव्हाळा नक्कीच होता, पण मालमत्तेच्या वादात भावंड मनाने दुरावली असल्याने बोलण्यातून अगतिकता कायम जाणवे
होळीला, रामनवमीला, एकादशीला होणारे उत्सव, त्यातील कीर्तन, महाप्रसाद वगैरे यथेच्छ वर्णनं तिच्याकडून मी ऐकली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण रिक्षा तिला फार आवडायच्या. एखाद्या नव्या नवरीला सजवावे तसे कोकणातील रिक्षावाले आपल्या रिक्षाला सजवतात हे मला सर्वप्रथम तिने सांगितले. कोकणात घर असलेल्या अनेक मित्रांकडून हे मला अजूनही ऐकायला मिळते. भगवान परशुराम कधीतरी आमच्यावर प्रसन्न होवो आणि हे सगळं अनुभवायची संधी आम्हाला ते देवो ही इच्छा.
बहुतांश लोकांप्रमाणे तिला आंबा या फळाचे सर्वाधिक आकर्षण. सुनेला जसा माहेरचा पाहुणा घरी येणार ह्या कल्पनेनं भरून येतं तशी तिला मार्च महिन्यात मंडईत कैऱ्या दिसल्यावर होत असे. मग कोकणात गावी तिकडे जोगळेकर का केळकर यांना फोनाफोनी सुरू व्हायची. आगाऊ बुकिंग करून ठेवतेय, दुसऱ्या कुणाला पेटी पाठवली तर याद राखा असा तिचा सज्जड दम होता. हवं तर या महिन्याला किराणा कमी भरू पण आंबा हा किमान दोन महिने वास्तव्याला असला पाहिजे असे तिचे मत. गोखले कुटुंबाच्या घराच्या ओसरीवर उन्हाळ्यात कायम रिकाम्या आंब्याच्या पेट्या व्यवस्थित ठेवलेल्या दिसायच्या. मध्येच फटीतून गवत बाहेर येतंय, चुरगळलेला पेपर अस्ताव्यस्त पडलाय असे नाही.
अगं माई, तुला डायबेटीस आहे, आंबे कसले खातेस? असं विचारलं की आयुष्यात एकच गोष्ट चवीने खावीशी वाटते तेही दोनच महिने मिळते, खड्डयात गेली ती तुमची डायबेटीस. सलाईन मधलं ग्लुकोस खाऊन जाण्यापेक्षा वर जाण्यापेक्षा आंबे खाऊन गेलेलं परवडेल. मग हा प्रतिवाद ऐकून अण्णा गोखले म्हणायचे, पुलं अंतू बर्व्याला पाहून नव्हे तर हिला पाहून म्हणाले असतील की एरवी साखर हिच्या जिभेवर कधी नाही पडली पण रक्तात मात्र हमखास पडली. असुदे असुदे. जिभेतुनच रक्तात जाते साखर असे त्यावर उत्तर यायचे. हे सगळे हुजूरपागा शाळेचे विद्यार्थी असलेच का ? असे अण्णा हळूच कानात सांगून हसायचे
एकदा तिच्या कोणा एका परदेशी नातेवाईकाने आंब्याचा रस मिक्सरमध्ये काढला असे फोनवर बोलताना कळवले. त्यावर तिचं पित्त जे खवळलं. आंब्याचा रस हाताने कसा काढावा, का काढावा ह्यावर तिने अर्धातास तिला सुनावलं. माणूस म्हणून तुम्ही जगण्याच्या लायकीचे नाही हा शेराही तिने मारला. अण्णा म्हणाले, जाऊदे गं ती काही का करेना, तू कशाला शाळा घेतलीस तिची? माईचे उत्तर एपिक सदरात मोडणारे होते. एवढी वर्षे संसार झाला तरी तुम्हाला मी कळले नाही हो, खुळेच आहात. कॉल इनकमिंग होता, आपल्या बिलात पैसे का लागणार आहेत. स्वतः एवढे कष्ट घेऊन अमेरिकेला फोन करण्याची हौस मला मेली कुठली?
लेख मोठा होत असल्याने कंटाळवाणा होऊ नये म्हणून या भागावरील वाचकांच्या प्रतिक्रिया पाहूनच पुढील भाग पोस्ट केला जाईल.
(क्रमशः) #MaaiGokhale
©ODJ

No comments:

Post a Comment