पावसाळा म्हणलं की ट्रेकिंग साठी आदर्श काळ. कॉलेज मध्ये असताना ट्रेकिंग चा भरपूर आनंद लुटायला मिळत होता. पण नोकरीच्या रहाटगाडग्यात रविवार हा हक्काच्या झोपेचा वार झाल्याने 'ट्रेक्स' या गोष्टीपासून जवळपास ३ वर्षे दुरावा निर्माण झाला होता. आजूबाजूचे मित्र बर्याचदा ट्रेक्सला जायचे, सुरुवातीला २-३ वेळा बोलावले पण माझी नकारघंटा कायम राहिल्याने बोलावणे हळूहळू बंद झाले. तरीही एखादा ट्रेक करायचा कित्येक दिवसांपासून मनात होते आणि निमित्त झाले नितीश बापटने आयोजित केलेल्या २३-२४ ऑगस्टला 'किल्ले राजमाची' चे. राजमाची हे ट्रेकर्सचे पावसाळ्यातील एक आवडते ठिकाण. मुळात नितीश बापट हा अत्यंत passionate ट्रेकर म्हणून सुप्रसिद्ध आहे, त्याच्या या passion ची मटा सारख्या पेपरने मागील वर्षी दखल घेतली. त्यामुळे त्याच्याबरोबर एक ट्रेक करायची इच्छा मनात होती. तसेच आमच्या खास Galaxians ग्रुप(हर्षद नवाथे, निखील दुराफे, बापट बंधू ) इतर सदस्यही या ट्रेक ला येणार असल्याने अजूनच उत्साहात भर पडली. साधारण ३ वर्षाने ट्रेक करत असल्याने काहीही सामान माझ्याकडे नव्हते. अगदी 'ट्रेकिंग शूज', टी शर्टस इत्यादी गोष्टींची खरेदी करण्यापासून तयारी होती. ती मी कशीबशी केली आणि ट्रेकला जाण्यास सज्ज झालो.
साधारण ७ च्या सुमारास आम्ही सर्व डोंबिवली स्टेशनला भेटलो. एकूण १८ जण या ट्रेकला येणार होते. त्यातील काही लोकांशी माझी ओळख असल्याने परिचयाचा अडसर आला नाही. तसेच आमचे पुण्याचे दोस्त नचिकेत पुरोहीत हेही येणार कळल्याने आनंदात भर पडली. ७.०८ च्या कर्जत लोकल ने आम्ही कर्जत गाठले. १५-२० मिनिटे चहा नाश्ता केला. आणि साधारण ८.४५ च्या सुमारास डेक्कन एक्स्प्रेस कर्जतला आली. त्यात आम्ही शिरलो. मी आणि हर्षदने गाडीच्या दरवाज्यात ठाण मांडले व लोणावळा येईपर्यंत मनसोक्त जुनी हिंदी गाणी गायलो. साधारण ९.४५ च्या सुमारास डेक्कनने लोणावळा गाठले. लोणावळ्यात एका हॉटेलात नाश्ता झाल्यावर आम्ही किल्ले राजमाचीच्या मार्गाला कूच केले
लोणावळ्यातील तुंगार्ली गावातून किल्ले राजमाचीकडे रस्ता जातो. सुरुवातीला डांबरी रस्ता नंतर किंचीत कच्च्या मातीचा अशाप्रकारे कोणतीही अवघड patch नसलेला रस्ता होता. मध्ये एका धबधब्यावर भिजण्याचा आनंदही आम्ही घेतला. खूप दिवसांनी T shirt, trackpant, hevay Sack, Trekking shoes इत्यादी घेऊन चालताना एक वेगळंच फिलिंग येत होतं. २ तास मजल दरमजल करत आम्ही थोड्या उंच पठारावर दुपारच्या जेवणाकरता थांबलो. ती जागा अत्यंत नयनरम्य होती. समोर धबधब्यावर एक ग्रुप Waterfall rapelling करत होता. एका बाजूला हिरव्यागार गवताची जणू दुलईच पसरली होती. तिथे आम्ही सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. जेवण झाल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. साधारण २.३०-३ तास चालल्यावर राजमाची गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. जिथे आम्ही त्या रात्री वास्तव्य करणार होतो त्या गावाला 'उधेवाडी' असे म्हणतात. पुणे वनविभाग या भागात ५ रुपये प्रवेशशुल्क घेते. तिथून आत गेल्यावर एका नयनरम्य पोइंट वर आम्ही थोडावेळ विसावा घेतला. तिथे लिंबू सरबताचा आस्वाद घेतला. तिथून पुढे मजल दरमजल करत उधेवाडी मध्ये 'श्री वरे' यांच्या घरी पोहचलो जिथे आमच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्या घरात आम्ही सामान ठेवले. श्री वरे यांनी कांदेपोहे व चहा दिला. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर नितीशने उधेवाडीतील एका ऐतिहासिक मंदिर व तळे बघायला जायचा बेत आखला. आम्ही तळयापाशी पोचलो व तिथे काही मंडळी पोहायचा आनंद घेत असताना आम्ही पाहिले. दिवसभर पावसाने दगा दिल्याने उन्हाच्या काहीलीतून साधारण ४-५ तास चालून चालून क्षीण आला होता, तो क्षीण दूर करण्यासाठी आम्ही त्या तळ्यात पोहायला जायचे ठरवले. सुदैवाने तळे फारसे खोल नसल्याने पोहता न येणाऱ्या मंडळीना मनसोक्त पोहायचा व थंडगार पाण्यात मजा करण्याचा आनंद घेता आला. पोहून बाहेर आल्यावर एकदम ताजेतवाने वाटले. तो पर्यंत तिथे किर्र अंधार झाला होता. तिथून आम्ही 'श्री वरे' यांच्या घरी गेलो तिथे जाऊन कपडे वगैरे बदलून फ्रेश झालो. उधेवाडी समुद्रसपाटीपासून साधारण २००० फुट उंचीवर आहे. आश्चर्य म्हणजे त्या गावात वीज नाही. सौरउर्जेवर चालणार्या एका दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात आम्ही बसलो. नचिकेत,प्राची, सचिन, सर्वेश, पार्थ इत्यादी मंडळी पत्ते कुटण्यात दंग झाली. इथे मी हर्षद, निखील, नितीश, अनघा, आकांक्षा, दीपाली ह्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. हर्षद, नितीश ने विनोद, शाब्दिक कोट्या-कोपरखळ्या मारून सर्वांची हसून हसून पुरेवाट केली. साधारण रात्री ९ वाजता जेवण आले. आमटी भात, दोन भाज्या, लोणचे, कोशिंबीर, आणि दही असा साधा पण चविष्ट मेनू होता. रात्री वातावरणही कमालीचे गार झाले होते. त्या अंधारात आणि गारव्यात जेवताना एक वेगळीच मजा आली. जेवण झाल्यावर परत गप्पा मारल्या तसेच आकांक्षा आणि मी एक गाणे सुद्धा म्हणले. साधारण ११.३०-१२ च्या सुमारास झोपायचे ठरले. कर्णधार नितीशने सर्वांना सकाळी ६ वाजता उठायची सूचना केली. आणि आम्ही झोपी गेलो
कर्णधार नितीशच्या आज्ञेनुसार आम्ही ६ वाजता उठलो. सर्व नैसर्गिक विधी आटपून 'मनोरंजन' गडाकडे कूच करायला निघालो. साधारण तासाभरात मनोरंजन गडावर आम्ही पोचलो. एकूणच राजमाचीच्या आजूबाजूच्या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान आहे. पावसाळ्यात या निसर्गाला 'हिरव्यागार मुकुटाचा' साजच बहाल होतो आणि डोळ्यांचे पारणे फिटते, बघणारा तृप्त होऊन जातो. पठारावर हिरव्या रंगाच्याच वेगवेगळ्या shades चे मनोभावी दृश्य पाहायला मिळते. मनोरंजन पाहून झाल्यावर साधारण ९-९.३० च्या सुमारास आम्ही परत उधेवाडीत आलो. तिथे वरे यांनी कांदेपोह्याचा नाश्ता व चहा दिला. थोडावेळ विसावा घेऊन कप्तान नितीशने प्रस्तावित दुसरा गड म्हणजे 'श्रीवर्धन' गडावर कूच करायचा आदेश दिला व आम्ही मार्गस्थ झालो. मनोरंजन गडाच्या मानाने श्रीवर्धन ची वाट सोपी नव्हती, अनेक चढ उतार पार करावे लागले. आदल्या दिवशी प्रमाणे वरुणराजाची अवकृपा दुसर्या दिवशीही कायम होती (याचे खापर कृपाने निखीलने ट्रेकच्या सुरवातीला केलेल्या भाकीतावर फोडले) तसेच उन्हाचा तडाखाही कायम होता, घाम निघत होता. साधारण १.३० तासात आम्ही 'श्रीवर्धन' वर पोहचलो. आमचे ध्येय साध्य झाले होते. संतोष ने 'शिवकल्याण राजा' मधील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करणारी आरोळी दिली व सर्वांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. श्रीवर्धन करून पुन्हा आम्ही १.३० च्या सुमारास उधेवाडीत आलो. २ गड करून पुरत घामट निघाल्याने परत तळ्यावर पोहायचा बेत आखला गेला. १५-२० मिनिटाची वेळमर्यादा कप्तान नितीशने त्यासाठी दिली. परत मनसोक्त पोहून झाल्यावर आम्ही वरेंच्या घरी परतलो. तिथे दुपारचे जेवण घेतले. मटकीची उसळ, कोबीची भाजी, भाकऱ्या, लोणचे, भात-आमटी असा सुग्रास फक्कड बेत होता. अशा चविष्ट जेवणावर मनसोक्त ताव मारल्यावर आपापले सामान आवरून बेगा भरायचे आदेश नितीशने सर्वांना दिले. अर्धातास आवराआवर तसेच packing मध्ये गेला आणि सर्व परतीच्या मार्गाला निघायला सज्ज झालो.
साधरण २.३० च्या सुमारास उधेवाडीला आम्ही 'जय महाराष्ट्र' केला, आणि परतीच्या वाटेला लागलो. यावेळी आमचे लक्ष्य लोणावळा नसून कर्जत हे होते. परतीचा मार्ग हा बऱ्यापैकी खडतर असा होता. लांब अंतर, मोठेमोठे उतार, त्यावर शेवाळे साचलेले, वेडेवाकडे ओबढ धोबड खडक, काही अवघड patches अशा आव्हानांनी भरून असा लांब मार्ग होता. आणि वातावरणातील भयंकर उष्मा हा अजून त्रासात भर घालत होता. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. उतरताना काही मंडळीना त्रास झाला, थकवा जाणवला. तरीपण एकमेकांना मदत करत, सांभाळून घेऊन हा खडतर मार्ग पार केला. साधारण ६.१५ च्या सुमारास पूर्ण डोंगर उतरून कर्जत जवळील 'कोंडाणे' गावापाशी आम्ही पोहचलो. तिथून आम्ही २ टमटम केल्या. आणि दोन गटात विभागून बसलो. मी बसलेल्या 'टमटम' मध्ये पुष्कर,नचिकेत,सचिन,बापट बंधू आणि दीपाली होतो. साधारण अर्धा तास जुन्या नव्या मराठी हिंदी गाण्याची मस्त मैफिलच आम्ही सर्वांनी रंगवली. पुष्करने अप्रतिमरित्या गायलेल्या बाबूजींच्या 'तोच चंद्रमा नभात' ला सर्वांनी भरभरून दाद दिली. गाणी म्हणता म्हणता कर्जत स्टेशन कधी आले हे कळलेच नाही. टमटम मधून बाहेर पाउल टाकतो रे टाकतो तोच पावसाचे आगमन झाले आणि तुफान चालू झाले. धावत आम्ही कर्जत स्टेशनच्या फलाटावर पोहचलो. ७.०० ची मुंबई ला जाणारी लोकल धरली. लोकल मध्येही नितीशने गप्पांच्या फडाचा ताबा घेत त्याच्या खास शैलीत विनोदांची खैरात करवून सर्वांना पुरेपूर हसवले. ८ वाजता डोंबिवली स्टेशन वर आम्ही उतरलो. हसऱ्या चेहऱ्याने एकमेकांचे अभिनंदन केले व पुढील ट्रेक असेच जोशात जोमात करायचे असा मानस व्यक्त करून एकमेकांचा निरोप घेतला.
टमटम
No comments:
Post a Comment