Monday, April 16, 2012

२४ मे-बिस्केरी थाच

सकाळी २.३० ला उठलो, तेव्हा वातावरण कमालीचे गार होते, अजिबात उठवत नव्हते, शरीर दगडासारखे झाले होते, कसबस सगळ आटपल. त्या दिवशी मी नाश्ता केला नाही(रात्री ७.३० लं जेवल्याने, आणी उपम्याच्या नावाखाली खीर पहिल्याने खायचा मुडच गेला). आज खरी कसोटी होती, “अब हम असली मैदान मे उतरे थे”. नजर फक्त सारपास वर होती. साधारण ५ वाजता आम्ही निघालो, सूर्य हळूहळू वर येत होता, आजचा रस्ता प्रचंड चढाचा होता. सारखी धाप लागत होती, आम्ही बर्फाच्छादित प्रदेशाकडे कुच करत होतो. बर्फ बघायला डोळे आसुसलेले होते कधीचे(मुंबईत बाप जन्मात पाहिलं नसल्याने). आज आमच्यासाठी युथ होस्टेल ने खास शेर्पा जमातीचे गाईड नेमलेले होते जे बर्फाच्छादित प्रदेशात सराईतपणे वावरतात(आपण मुंबईत रेल्वे स्टेशन वर पण वावरत नाही इतक्या सफाईने हे बर्फात चालतात). एका पोईंट ला पोहोचल्यावर आम्हाला दुरवर लांबच लांब पसरलेलं बर्फ दिसल. आणी सारपास आता काहीच अंतर दूर होता. खर तर मी डोंबिवलीतच ठरवलेल होत कि एक भगवा झेंडा घेऊन जायचा इकडून आणी तिकडे रोवायचा, पण तो काही मिळाला नाही(काय बाळासाहेब, राजसाहेब, डोंबिवलीत भगवा उपलब्ध झाला नाही). मला काही करून तो रोवायचा होता. उत्तर भारतात मला भगवा मिळणं फारच अशक्यप्राय होत. मी आमच्यातल्या बऱ्याच जणांकडे भगव्या रंगाच्या कापडासाठी चौकशी चालू केली होती अगदी पहिल्या दिवसापासून, पण कुणाकडे काही मिळत नव्हत. त्या दिवशी पण माझा भगव्या कापडाचा शोध चालूच होता. सारपास जेमतेम तास-दिडतासावर ठेपला होता. बर्फात चालता चालता सहज मी पंजाबदा शेर अर्जीन्दार उर्फ सोनू याला सहज विचारले भगव्या कापडाविषयी(त्या दिवशी मला काहीही चालल असत, ओढणी, टोवेल अगदी napkin पण चालला असता). तर त्याने लगेच मला त्याचा डोक्याला बांधायचा भगवा रुमाल काढून दिला(त्याला सुद्धा मराठी मातीशी इमान होतं, मुंबईचा होता, बघा मराठी माणसानो). भगवा पाहिल्यावर माझा बारा वाजेलेला चेहरा जो काही खुलला आणी अंगात कुठून एक प्रकारचा जोर आला(जस गाडीत एक्स्ट्रा प्रीमियम पेट्रोल भरल कि गाडी मध्ये जान येते), मी प्रसाद आणी माझ्या इतर सवंगड्याना हाक मारत अक्षरश पळत सुटलो. प्रसाद माझ्या नजरेच्या रेंज मध्ये दिसला, अक्षरश पळत जाऊन त्याला मी भगव कापड दाखवलं. त्याचा चेहरा पण प्रचंड खुलला, नंतर प्रदीप आला, त्याला पण प्रचंड आनंद झाला भगवा पहिल्याने. मग आम्ही सर्वानी एक काठी घेऊन त्या भोवती भगव कापड गुंडाळून त्याचा अगदी व्यवस्थित ‘भगवा झेंडा’ केला. आणि एकदाचे सारपास पाशी पोहोचलो.

वास्तविक सारपास शिखराच्या टोकावर जायला बर्फाचा मोठा चढ पार करायचा होता, पण गाईड ने सांगितले तुम्हाला हव तर जाऊ शकता, मी आणी प्रसाद धैर्य करून बऱ्याच उंचावर गेलो भगवा घेऊन आणि तिकडे भगवा रोवला बर्फात. जेव्हा बर्फात चढ चढण अगदीच अशक्य झालं, तेव्हा सारपास च टोक काहीच अंतरावर होत, पण जाण शक्य नव्हत. मी धडपडत, आपटत आटोकाट प्रयत्न करत होतो वर जायचा पण काही जमल नाही आणी प्रसाद ने पण न जाण्याचा सल्ला दिला तो मी नाईलाजाने ऐकला. आम्ही भल्यामोठ्या चढाच्या टोकावर होतो. सरळ चालत उतरण बर्फातून शक्यच नव्हत. शेवटी मी आणी प्रसाद ने बर्फातून स्लाईड केली आणी पाय्थ्याशी आलो. तो पर्यंत ‘रंगीन पांडा’ ग्रुप ची बाकी मंडळी हजार झाली. तिकडे सर्व बर्फात स्लाईड करू लागले, आपल्या मराठी मंडळी मधील सोमण काका, संतोष, कविता-नेहा यांनी देखील भगव्या बरोबर फोटो काढून घेतले. मग ब्रेक झाल्यावर निघायच्या वेळी मी प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अशी जोरदार घोषणा दिली आणी सर्वानी नंतर एकसुरात जय म्हणत तो परिसर दणाणून सोडला.

सारपास ला पाय लावून आल्यावर आम्हाला बिस्केरी कॅम्प गाठायचा होता, जो माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय प्रवास होता. जस सारपास वरून आम्ही बर्फात पुढे चालत होतो, तर समोर दिसला अत्यंत अरुंद असा बर्फाचा रस्ता, खाली भलामोठा बर्फाने भरलेला उतार, त्या अरुंद वाटेत पाय सटकला जर बर्फात तर माणूस उतारावर किमान ५० एक फुट खाली स्लाईड होतो(आमच्यातील सोमण काका, जुमाना,नरेन हे खाली स्लाईड झालेच). अत्यंत बिकट अशी वाट होती ती, मध्येच पाय बर्फात खोल रुतायचा, पाठीवर भलमोठ सामान, अंगावर सुती जाड कपडे, त्यात चालून चालून धाप लागायची(जरा थांबल की तो नालायक शेर्पा शिटी मारायचा आणी चालायची सूचना द्यायचा) अश्या समस्यांवर मात करत आम्ही तो मार्ग एकदाचा पार केला आणी एका डोंगराच्या कड्यावर पोहोचलो, जिथून एक सुसाट प्रवास चालू होणार होता. त्या डोंगरावरून आम्हाला हे भल्यामोठ्या बर्फाच्या उतारावर जवळपास १ किमी स्लाईड करत(घसरत जात) जायचं होत(सामानासकट). एकेक जण पुढे जायला लागला, माझ्यापुढे मंदार,प्रसाद, प्रदीप गेले, मग मी जसा उतारावर बसलो, पाय पसरले, आणी हात वर करताच जे घसरगुंडीसारखा घसरत खाली जायला लागलो ते पण सुसाट वेगाने(अगदी घसरगुंडी वरून उतरतात तस), मला एकदम ६०-७० ने बाईक चालवल्यासारख वाटत होत. मी तुफान वेगाने घसरत चाललेलो, शेवटी जिथे उतार संपला तिथे माझ्या वेगाला चाप लागला, आणी मी काही क्षण तेथेच बसून राहिलो, एकदम मला भलत्याच विश्वात गेल्यासारखे वाटते, मजा,थ्रील,वेग,साहस या सगळ्या गोष्टी एकदम अनुभवायला मिळाल्या होत्या त्यामुळे छाती नुसती जोरजोरात धडधडत होती. जरा दम खात होतो तर तेवढ्यात पाठून जुमाना उर्फ जुम्मी तुफान वेगाने घसरत आली आणी तिचा वेग कंट्रोल न झाल्याने माझ्या बॅगेवर जोरात आदळली, आणी मी तिच्या धक्क्याने उलटा पालटा पडलो बर्फात.(लाथ घातली तिने पेकाटात तर काय होणार माझ). मग थोडीशी मजल दरमजल करत बर्फातून चालत होतो, मध्येच हिमनद्या प्रचंड वेगाने वाहताना दिसत होत्या. परत एका पोईंट वर जेव्हा पोहोचलो तेव्हा अजून साधारण १ किमी ची दुसरी स्लाईड करायची होती. मला खूप आनंद झाला ते ऐकून. मग परत तंगड्या पसरून हात वर करून जे उतारावर आपली डेक्कन क्वीन धावत सुटली की विचारू नका. या वेळी उतार अजून स्टीप होता मागच्यावेळपेक्षा, त्यामुळे वेगही जास्त होता, या वेळी तर मला वेग नियंत्रित करता न येऊन डोक्यावरून आपटून उलटा पालटा होत गडगडत मी काही अंतर गेलो आणी आपोआप त्याच वेगात परत मूळ पोझिशन वर आलो(मला कळल नाही हे कस शक्य आहे पण झाल खर). उतार एकदाचा संपला, या वेळी पटकन उठलो(नाहीतर परत लाथ बसायची पेकाटात). मग मजल दरमजल करत आम्ही एकदाचे ‘बिस्केरी थाच’ कॅम्प वर पोहोचलो. त्या दिवशी तिकडे नाश्त्याला गरमागरम मुगभजी होत्या, आमच्यातील प्रत्येक जण बांगलादेशातून आल्यासारखा भजीवर तुटून पडला, त्या गाईड ने पण आमच्या भुकेल्या निर्वासित बांधवाना भरपूर वेळा मुगभजी रिपीट दिल्या.(अर्ध्या आम्ही जोशी ग्रुप ने संपवल्या). मग सूप प्यायलो. त्या दिवशीची प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं, आयुष्यात काहीतरी जिगरबाज कृत्य केल्याच सुख लाभत होत, मला तर विश्वास च बसत नव्हता की कसोल मधून अशक्यप्राय वाटणारा सारपास आम्ही सर केला, तो पण निर्विघ्नपणे. अगदी जेष्ठ नागरिक असलेल्या मा पा पासून ते १५ वर्षाच्या गुजराती मुलापर्यंत सर्वानी ती सफर यशस्वी केली होती. कुणीही माघारी परतला नव्हता. सर्वच्या सर्व धडधाकट होते. बिस्केरी वर आम्ही आमच्या ग्रुप च्या नावाने एकच जल्लोष केला. मग नंतर आम्ही मोकळ्या वेळात ‘दमशेराज’ खेळलो. त्यात मंदार ने सुंदर अभिनय करून चित्रपट ओळखायचे काम सोपे केले.(एकेक चित्रपटांची नाव अगाध होती हा भाग वेगळाच). मग जेवण केले, त्या रात्री मी आणी आमच्यातल कुणीच कॅम्प फायर मध्ये सहभागी न होता निद्रेच्या अधीन व्ह्याचे ठरवले आणी जय महाराष्ट्र म्हणत भरल्या मनाने सुखात झोपलो.

२५ मे –‘भंदक थाच’

हा आमच्या सफरीतला शेवटचा कॅम्प होता. आम्ही हळूहळू पायथ्याशी वाटचाल करू लागलो होतो. आता चढ चढायचा नसल्याने मला जरा जड बॅग घेऊन उतरायला थोडस सोप पडत होत. आजचा प्रवास तसा जास्त होता, सुमारे ७-८ किमीचा होता. भंदक थाच’ कॅम्प ला युथ होस्टेल वाले भारताचे स्वित्झर्लंड म्हणतात, पण स्वित्झर्लंड पाहिलं नसल्याने मी तुलना करणार नाही. पण एवढ मात्र नक्की सांगू शकतो की इतर बाकी कॅम्प पेक्षा –‘भंदक थाच’ स्पॉट ला निसर्ग अफलातून होता. निसर्गाने भरभरून सौंदर्याचे दान या प्रदेशात टाकल होत. अतिशय विस्तीर्ण अस हिरवगार माळरान आणि वर आम्ही सर् करून आलेला साक्षात हिमालय होता. आम्ही जेव्हा प्रवासाची सुरुवात भून्तर पासून केली तेव्हा छान आल्हाददायक वातावरण होते त्यानंतरचे सर्वात सुंदर वातावरण तेव्हा त्या वेळी होते. कदाचित आता आपल्याला यापुढे चालाव लागणार नाही अजून या भावनेने अजूनच छान वाटत होत. नेहमी आम्ही कुठल्याही कॅम्प वर आलो की पहिले आडवे व्हायचो थोडावेळ, पण तिथे काहीतरी धावाव,खेळाव, धमाल मजा मस्ती करावी अस वाटत होत सर्वानांच. योगायोगाने त्या कॅम्प साईट वर आम्हाला एक कापडी चेंडू मिळाला. मग आम्ही अबधुबी किवा शेकाशेकी खेळायचं ठरवल. महाराष्ट्र विरुद्ध बाकी राज्ये अशी गटविभागणी झाली. गुजराती बांधवांना चेंडूने शेकवून शेकवून आम्ही पुरते बेजार केले. खूप दिवसांनी धावल्या-पडल्या मुळे बालपणीच्या त्या खेळाच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छान खेळ झाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. त्यात खेळता खेळता प्रसाद धडपडला आणि नेमका त्याच्या खिशातील त्याच्या मोबाईल वरच. त्याचा ७५ किलोचा देह (मी अंदाजेच सांगतोय, कमी जास्त किंबहुना जास्तच असाव)त्या मोबाईल वर पडला, हे लक्षात आल्यावर लगबगीने त्याने मोबाईल बाहेर काढला(एरवी माणूसही चेपला असता). सुदैवाने मोबाईल शाबूत होता(बघा नोकियाचे पीस किती धडधाकट असतात त्याचा अजून एक नमुना). मोबाईल काही चालू होईना, प्रसादच्या चेहऱ्यावर किंचितशी चिंता उमटली पण त्या निमित्ताने नवीन मिळेल हा विचार त्याला सुखावत होताच. पण मजा अशी झाली त्याच्या मोबाईलची battery संपल्याने तो बंद होता, जेव्हा चार्जिंग चालू केल तेव्हा व्यवस्थित चालू झाला(आणि तो अजूनही वापरतोय तो पीस).

नेहमीप्रमाणे सूप वगेरे झालेच. आमचे नेते सोमणकाका यांनी सर्वांना बोलावले आणि त्यांचे Contact details एका कागदावर लिहून द्यायला सांगितले आणि ते गोळा करायची जवाबदारी मी आणि प्रसादने उचलली. त्याचबरोबर ह्या ट्रेक मध्ये जमलेली सर्वांची मैत्री अशीच कायम राहावी आणि पुढेही सार्वजन एकमेकांच्या संपर्कात राहावे यासाठी ओर्कुट आणि फेसबुकवर ‘रंगीन पांडा २०१०’ अशी Community काढायची ठरले आणि ती जवाबदारी अविनाशने उचलली. मग जेवणाचा कार्यक्रम ठरला आणि त्या दिवशीची कॅम्प फायर जोरदार करायचे ठरले. साधारण ९ वाजता कार्यक्रम चालू झाला. तिकडे प्रकाशासाठी आम्ही एक कल्पना काढली, लाकडे न जळवता आम्ही सर्वांच्या Torches गोळा केल्या आणि डिस्को लाईट प्रमाणे त्या अरेंज करून छान पैकी वातावरणनिर्मिती केली. त्या दिवशी प्रत्येकाने almost काहीना काहीतरी कला सदर केली. सुरुवातीला कोळीनृत्य, गरबा मग सोनूच्या ग्रुपचे आधुनिक रामायणाचे नाटक, दीपाचे नृत्य,दक्षिण भारतीय मंडळीचे folk गायन, दोन्ही मांचे सुंदर आवाजातील गायन असा कार्यक्रम रंगत होता. मग लोकाग्रहास्तव मी ब्रेथलेस गाण परत एकदा सादर केल त्यादिवशी. त्या कॅम्प फायरला खुपच धमाल आली. ती रात्र कधीच संपू नये अस प्रत्येकाला मनोमन वाटत होत. पण वेळेच्या आणि जागेच्या मर्यादा पाळण तितकच महत्वाच होत. नेहमीप्रमाणे Bournvita पिऊन आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो

२६ मे- बेस कॅम्प कडे कूच

नेहमीप्रमाणे शिट्टीच्या आवाजाने आम्ही ५ वाजता उठलो(आम्ही म्हणजे मी सोडून सगळे, मला रोज फटके, लाथा मारून उठवायची जवाबदारी प्रसाद,मंदार,गौरव,श्रीकांत हे अगदी इतिकर्तव्य असल्यासारखे पार पाडतच होते. मी प्रदीपचे नाव घेत नाही कारण तो पण माझ्याच कंपूतील होता). एवढ्या पहाटे कदाचित आमची ती शेवटची वेळ होती उठायची. सगळे जण आवरून, स्लीपिंग बॅगस, blankets, परत करून लाईन लावून उभे राहिलो. ७ च्या सुमारास आम्ही भंदक थाच’ सोडले. आणि आमच्या कसोलच्या बेस कॅम्पकडे मार्गक्रमणा करू लागलो. As Usual मी आमच्या जोशी ग्रुप बरोबर न जाता सोनुच्या ग्रुपबरोबर चालू लागलो(ह्या लोकांना मरणाची घाई असते म्हणून आणि सोनूचा ग्रुप सर्वात शेवटी आरामात येतो, छान चकाट्या पीटत.) तिकडे आम्ही सगळे छान छान गाणी म्हणत टिंगल टवाळी करत हळूहळू येत होतो. असच बोलता बोलता कळले की दीपाबाई पण वाणिज्य शाखेच्या आहेत मग आमच्या accounts and commerce वर चर्चा चालू झाल्या. ती नावाजलेल्या KPMG फर्म मध्ये नोकरी स्थानकापासून थोड चालल्यावर मणीकर्ण आले.

मी या आधी गुरुद्वारा पहिला नसल्याने थोडस कुतूहल नक्कीच होत. प्रसादच्या सूचनेनुसार डोक्याला रुमाल बांधला. पण खरच पंजाब आणि पंजाबी लोक काय चीज असतात हे मला मणीकर्ण पाहिल्यावर २ दिवसात समजल. शीख समाजाविषयी मला फार आदरभाव नव्हता याआधी. पण २ दिवस गुरुद्वार्यात वास्तव्य केल्यावर “पंजाब दी मिट्टी दा असली रंग पता चल गया मेनू”. इतका सेवाभाव,श्रद्धा, भक्तिमय वातावरण हे पाहून मी भारावून गेलो. वास्तविक मणीकर्ण हे जगात तेथील गरम पाण्याच्या कुंडकरता प्रसिद्ध आहे. तेथील कुंडात आंघोळ करणे म्हणजे मोठ पुण्य आहे अशी हिंदू आणि शिखांची भावना आहे. इतके दिवस अंघोळ न करूनही मला अंघोळ करावीशी वाटली नाहीच त्या दिवशीही. बाकी सदस्य अंघोळ करून आले, आणि सर्वांच्या सामानाची देखभाल करायची जवाबदारी माझ्यावर दिली गेली.

मग आम्ही मुख्य देवस्थानाकडे रवाना झालो. एका प्रशस्त आणि भव्य जागेत वाहेगुरू गोविंदसिंग यांची तसबीर आणि पालखी आणि त्याला वारा घालणारा म्हातारा लांबलचक दाढीचा बाबाजी. हे असल् दृश्य मी चित्रपटातच पाहिलेलं होत पण आज प्रत्यक्ष पाहत आणि अनुभवत होतो. मी मनोभावे वाहेगुरुना आणि ‘गुरु ग्रंथसाहिब’ आणि त्या बाबाजीना नमस्कार केला. तो गुरुद्वारा नेहमीच गर्दीने फुललेला असतो. मी तिकडे आल्यापासून पंजाबी लोकांना बारीकपणे न्याहाळत होतो, मला हेवा वाटला ते त्यांच्या भरदार व्यक्तिमत्वांचा. जवळपास सगळे पुरुष एकदम आडदांड, उंचपुरे, आणि तगडे एकदम असली मर्द. आणि सुंदर नव्हे पण कमालीच्या सुंदर, रेखीव बांध्याच्या गोऱ्यापान मुली. त्यांची फिचर्स अत्यंत भारी आणि लोभस होती(क्षणभर मराठी मुली झक मारतील असा विचार आला, तो मुंबईत परत आल्यावर लगेच बदलला). खरच, सो कॉल्ड पंजाबी ड्रेस फक्त पंजाबी मुलीना सर्वात सुंदर दिसतो. बायका असो व पुरुष त्यांच्या वागण्या-बोलण्यातून, हालचालींवरून अस्सल पंजाबिपणा स्पष्टपणे जाणवत होता. मला खर तर पगडी घालून(पुणेरी नव्हे पंजाबी)फोटो काढून घ्यायचा होता. पण आपली personality मी आरशात न्याहाळली आणि उगाच पंजाब्यांची लाज घालवायला नको म्हणून विचार सोडून दिला. नंतर आम्ही गुरुद्वार्याच्या ऑफिस मध्ये जाऊन खोलीसाठी विचारणा केली आणि लगेच मिळालीही तीही विनामुल्य. मग अंघोळ करून आलेले आवारात बसले, मी आडवा झालो. आवरण झाल्यावर आम्ही निवांत बसून आतापर्यंत झालेल्या खर्चाचा हिशोब मांडला. हिशोब करायच्या पद्धतीवरून प्रदीप आणि प्रसाद मध्ये थोडे मतभेद झाले. पण प्रदीपने खरच काटेकोरपणे आणि परफेक्ट हिशोब मांडला आणि बाकी उरलेली रक्कम सर्वाना समान विभागणी करून परत दिली. हिशोब झाल्यावर आम्ही महाप्रसाद म्हणजेच ‘लंगर’ साठी रवाना झालो. देव्स्थानाशेजारील एका प्रशस्त हॉल मध्ये लंगर होते. जवळपास ५००-१००० लोकांच्या क्षमतेचा तो हॉल होता. तिकडे अखंड दिवसभर लंगर चालू असायचे. शिखांचा सेवाभाव आणि श्रद्धा पाहून खरच अचंबा वाटतो. तिकडले वाढपी किवा सेवेकरी हे आमच्यासारखे क्षुद्र माणसे नव्हती तर गडगंज संपत्त बाळगणारे श्रीमंत पंजाबी उद्योगपती किवा शेतकरी होते. निव्वळ काहीतरी सेवा म्हणून अशा प्रकारची कामे करण्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नव्हता. लंगर मधील अस्सल पंजाबी जेवणाची लज्जत मी पहिल्यांदा अनुभवली. साधे परंतु अत्यंत चविष्ट जेवण होते ते. लंगर आटोपल्यावर आम्ही बाहेर आलो. आम्हाला कसोल ला परत बेस कॅम्प ला परतायचे होते कारण आमचे सामान आम्हाला आमच्या ताब्यात घ्यायचे होते. दुपारी ४ पर्यंत आम्ही बेस कॅम्प ला पोहोचलो(गेल्यागेल्या मी आणि अर्थात प्रदीप आडवे झालो). संध्याकाळभर आम्ही उनाडक्या करत बसलेलो कारण आमची दुसऱ्या दिवशी भून्तरहून दिल्ली करता बस होती. आमच्यातल्या खूप जननी संध्याकाळीच निरोप घेतला. बाकीच्यांचा निरोप लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायचा होताच. रात्री परत एकदा जेवण आणि नवीन बॅच कॅम्प फायर मधील पर्फोर्मंस पहिले आणि आडवे झालो.

सारपास. २७ मे- परतीच्या वाटेवर

आज बरेच दिवसांनी आम्हाला शिटीमी आयुष्यातून ब्रेक मिळाला. जरा फुरसतीत म्हणजे ६ वाजता उठलो. सगळं आटोपलं. माझ सगळ्यात नावडतं काम जे म्हणजे bag भरणे ते शेवटचे उरकले एकदाचे. साधारण नाश्ता झाल्यावर आम्हाला चेक आउट होते म्हणजे आम्हाला कॅम्प सोडायचा होता. आमच्या ग्रुप मधील काही जण अजूनही वास्तव्य करत होते आणि त्यांनापण निरोप घ्यायचा होताच. आम्ही शेवटचा नाश्ता एकत्र बसून केला. प्रत्येकालाच कॅम्प सोडून जायची वेळ जवळ येत होती तसतशी मनाला हुरहूर लागत होती. एवढ्या दिवसाच्या एकत्र सहवासाने आपापसात मैत्रीचे सुंदर नाते निर्माण झालेलं आणि विशेष म्हणजे त्याला वयाचे, पैशाच्या मर्यादा नव्हत्या. शेवटी ती वेळ आलीच. जोशी ग्रुप व इतर उरलेली SP 17 बॅच ची मंडळी चेक पोईंट पाशी जमली. आम्ही आमचे लाडके मुंबईकर कॅम्प लीडर श्री गोगटे सरांना भेटलो त्यांना निरोप दिला त्यांचे आशीर्वाद घेतले. तिकडून बाहेर आल्यावर एकमेकांना हस्तांदोलन करून निरोप देत होतो. सर्वानी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. गुजराती ग्रुपने खास करून ‘आम्ही तुम्हाला खूप मिस करू’ अशी जोशी ग्रुप ला विशेष compliment दिली(आता कुणी कुणाला कुणासाठी दिली हे जोशी ग्रुप जाणतोच). तिकडून सर्वांचा निरोप घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

Monday, October 24, 2011

हा लेख खास आजच्या युवा प्रेमवीरांसाठी!

तुमच्या प्रेयसीला प्रेम व्यक्त करण्यासाठी चांदतारे आणायला पाहिजेत असं अजिबात नाही, छोट्या छोट्या गोष्टींतूनही प्रेम व्यक्त करता आला पाहिजे!
इमोशनल झाल्यावर थोपटणं, मिठीत घेणं किंवा एक प्रेमळ मिठी, बस्स आणि काय हवं असता तिला अजून?
वेळोवेळी प्रेम व्यक्त करायला शिका..
... ... बर्थ डे किंवा अशाच प्रसंगी तुम्ही दिलेलं सरप्राइज तिच्यासाठी खूप मोठं गिफ्ट असतं....
तुम्ही ड्राइव्ह करता, तेव्हा ती एन्जॉय करते ना ? मग, तीन ड्राइव्ह करतानाही एन्जॉय करायला शिका...
आपली डेट रोमॅण्टिक डेट होईल, याची काळजी तुम्हीच घेतली पाहिजे......
तुमच्याबरोबर कॅण्डल लाइट डिनर देणं याहून अधिक सुखद अनुभव कोणता असू शकतो ?
तिला तुमच्या एकट्यासोबत हक्काचा काही वेळ रोमॅण्टिकली घालवायला खूप आवडतो...
थोडंफार जग तिलाही कळतं, म्हणूनच तिनं केलेल्या सूचना, तीच मत विचारात घ्यायला हरकत नाही...
तिलासुद्धा स्पेस हवी हे लक्षात ठेवा..
तुम्ही जसे आहात, तसेच तुम्ही तिचे असता, मग ती जशी आहे, तसंच तुम्ही तिला स्वीकारायला हवं...
हो, तीही खूप पझेसिव्ह असते आणि खूप सेन्सिटिव्हसुद्धा ! तीच असं वागणं समजून घ्यायलाच हवं, कारण हा तिचा तुमच्यावर असलेला प्रेमच असतो....
तुमच्या फॅमिलीचा आदर ती ठेवते त्यांना आपला समजते, तुम्हीसुद्धा तिच्या आईवडिलांना स्वत: ची फॅमिली समजलंच पाहिजे...:
दिवाळी म्हणजे सणांची राणी. आनंदाचे उधाण. नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, फटाके, गोडधोड पदार्थ इत्यादी. हे झाल पारंपारिक टिपिकल समीकरण. या वर्षी एक मी प्रकर्षाने पाहिलं की दसरा होऊन १० दिवस झाले तरी दिवाळीच्या चाहुलीचा काही पत्ताच नाही. दिवाळी अवध्या १५ एक दिवसांवर आहे असे वाटतच नव्हतं. अचानक माझं मन flashback मध्ये गेलं. मी साधारण १०-१२ वर्षांपूर्वीच्या काळात गेलो. तेव्हाचं दिवाळीचं स्वरूप आणि आताचं यात काळानुरूप बराच फरक पडलाय. साधारण दसरा-दिवाळी एकाच महिन्यात येत असल्याने त्या महिन्याच्या सुरुवातीलाच घरातील बायका (विशेष सूचना-मी मध्यमवर्गीय दिवाळी बद्दल बोलतोय जिंदल, अंबानी, टाटा यांच्या नाही )पुरुषांना सांगून ठेवायच्या, "या महिन्याला किराणा जास्त लागेल, फराळाचे पदार्थ तयार करायचे आहेत". मग बायकांचे नंडेला, जावेला, सासुबाई इत्यादी 'फराळ मेकर' टीम ला फोन चालू व्हायचे, मग फराळाला मदतील ये असा निरोप एकमेकींना मिळायचा. दसरा झाला रे झाला की पोरांच्या सहामाही संपायची, आणि मग एखादा शनिवारी-रविवारी घरातील कर्ते पुरुष स.कु.स.प 'खरेदी' नावाचा सोहळा पार पाडायला बाहेर पडायचे. बरीच दुकानं हिंडून, कैक तास रेंगाळत एकदाचे हवे तसे कपडे मिळाले, आणि मुलांसाठी फटाके घेतले की कुटुंबाच्या आग्रहाखातर हॉटेलातच रात्रीचे जेवण होई. मग दिवाळीच्या सुट्टीत पिस्तुल घेऊन लहानगे फटाके फोडायला चालू करीत. रोज संध्याकाळी फटाक्यांचे आवाज सर्रासपणे एकू येत. फोनवर ठरल्याप्रमाणे बायकांचा गोतावळा जमे, आणि चालू होई फराळाची तयारी. कुठे भाजणी भाजल्याचा वास, कुठे नारळ खवल्याचा आवाज, कुठे बेसन भाजतानाचा खमंग वास येई तर कुठे बायका सोर्यातून चकलीचे आकार पडताना दिसत. मग बायकांमध्ये तुझी चकली बिघडली का ? माझी बिघडली, माझ्या करंजीच्या सारणात साखरच कमी पडली तुझ्या पडली का ? वगेरे चर्चा ऐकू येत. तेव्हा 'रेडीमेड फराळाचे आयटम' हा प्रकार अस्तित्वात नव्हताच. मग डायरीतील नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र- मैत्रिणींना दिवाळीचे ग्रीटिंग पाठवण्यासाठी पत्ते काढले जायचे. मग बाहेरगावच्या लोकांना साधारण आठवडाभर आधी ग्रीटिंग, आणि ख्याली खुशाली विचारणारे पत्र पोस्टाने पाठवले जाई, त्याच बरोबर आलेले ग्रीटिंग पाहून एक विलक्षण समाधान चेहऱ्यावर झळकायचे. ती ग्रीटिंग वर्षानुवर्षे जतन केली जायची . घरातील नोकरदार पुरुषांना दिवाळीची विविध गिफ्ट्स मिळायची. त्याचं एक आगळंच कौतुक असायचं.

साधारण नरकचतुर्दशीच्या आदल्या रात्री लवकर जेवणं व्हायची., जेणेकरून लवकर झोपून पहाटे लवकर उठता येईल. साधारण पहाटे ३ च्या सुमारास उठून तयारीची लगबग चालू व्हायची. सुगंधी तेलाच्या वाट्या , आणि उटणी तयार असायची. मग घरातील पुरुष मंडळीना बायका तेल लावायच्या, आणि उटण आणि मोती साबणाने अभ्यंग स्नान व्हायचे. मग शास्त्राप्रमाणे देवाची पूजा करून फराळाचा नेवेद्य दाखवला जायचा. मग फराळाच्या विविध पदार्थांचे डबे बाहेर काढले जायचे, मग एका मोठ्या ताटात लाडू, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव, चिवडा इत्यादी मांडले जायचे. मग अशी एखाद दोन ताट शेजारी पाजारी दिली जायची आणि त्यांच्याकडून पण एखाद दुसरे ताट यायचे. खाऊन झाल की फटक्यांची पिशवी आणि उदबत्ती घेऊन आबाल वृद्ध गच्चीत किवा मोकळ्या जागेत फटाके उडवायला जायची. पहाटेपासून फटक्याचा nonstop आवाज थेट दुपारपर्यंत असायचा. मग विशेष जेवण न करता तेच पदार्थ जेवताना खाल्ले जायचे. दुपारी वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळची लक्ष्मीपूजनाची तयारी चालू व्हायची, संध्याकाळी ६.३० नंतर लक्ष्मीपूजन व्हायचे. नंतर परत संध्याकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत फटक्यांची आतषबाजी असायची. रात्री आकाशात रॉकेट उडतानाचे दृश्य विहंगम वाटायचे.

आताच्या काळात हे टिपिकल schedulde बरेचसे बदलले आहे. विशेष fact म्हणजे पूर्वी फराळाचे पदार्थ दिवाळीला एकदाच केले जायचे आणि खाल्ले जायचे, हल्ली १२ महिने चकली चिवडा करंजी इत्यादी अगदी 'easily available' असल्याने वर्षभर खाल्ले जाते त्यामुळे त्याचे glamour नाहीसे झाले आहे. सध्या सर्वाना जाणवणारा एकच problem, तो म्हणजे वेळेचा अभाव, नोकरदार बायकांना फराळ करायला वेळ नसल्याने, रेडीमेड फराळाच्या उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे मायेच्या हातच्या फराळाची चव चाखायला मिळत नाही. कपड्याची खरेदी पण एरवी वर्षभर होतच असल्याने, दिवाळीच्या खरेदीचे तितकेसे आकर्षण राहिलेले नाही. वाढत्या महागाईने जरा खरेदीला कात्री लागल्याचे स्वरूप पहावयास मिळते. 'दिवाळी पहाट' हा एक आगळाच कन्सेप्ट खासकरून मुंबई पुण्यात चालू झालेला दिसतो. डोंबिवली मध्ये दिवाळीच्या पहाटे 'फडके रोड' वर सगळी तरुणाई एकत्र जमते. सगळे मित्र मैत्रिणी, आप्तेष्ट जमून एकमेकांना शुभेच्छा देतात. हाच कित्ता ठाण्यात राम मारुती रोड, पुण्यात सारसबाग, दादरला पार्कात गिरवला जातो. परवा एक मजेदार किस्सा पाह्यला मिळाला, एक शाळकरी मुलगा त्याच्या मित्राला विचारत होता, की “अरे ते फडकेला जातात ना त्यादिवशी कुठला वार आहे?” हे जितक हास्यास्पद आहे तितक कीव करण्यासारखं आहे. पूर्वी खरेदी वर्षातून कधीतरीच होई, आणि दिवाळी त्यातील एक मुख्य निमित्त होते, हल्ली वर्षभर काहीना काहीतरी कपड्यांची खरेदी होतच असल्याने त्याचं पण नाविन्य राहिलेलं नाही. फटाक्यांच प्रमाण पण लक्षणीय कमी झालेले आहे ही एक चांगली बाब. अभ्यंग स्नाना मध्ये कृत्रिम creams, moisturizers, cosmetics ची भर पडली. SMS, Email मुळे ग्रीटिंग ची देवाण घेवाण कमी झाली. एका आनंदाच्या सणाचे बाजारीकरण झालेले आहे. कुठेतरी सणाचे धार्मिक महत्व लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे. सात्विकता कमी होऊन सणाचे भडक बाजारीकरण झालेले आहे. शेवटी काळानुसार enjoyment च्या ज्याच्या त्याच्या पिढीच्या कन्सेप्ट मध्ये फरक पडतोच म्हणा. चालायचंच ‘कालाय तस्मै नमः’ .म्हणायचं .