आज बरेच दिवसांनी आम्हाला शिटीमी आयुष्यातून ब्रेक मिळाला. जरा फुरसतीत म्हणजे ६ वाजता उठलो. सगळं आटोपलं. माझ सगळ्यात नावडतं काम जे म्हणजे bag भरणे ते शेवटचे उरकले एकदाचे. साधारण नाश्ता झाल्यावर आम्हाला चेक आउट होते म्हणजे आम्हाला कॅम्प सोडायचा होता. आमच्या ग्रुप मधील काही जण अजूनही वास्तव्य करत होते आणि त्यांनापण निरोप घ्यायचा होताच. आम्ही शेवटचा नाश्ता एकत्र बसून केला. प्रत्येकालाच कॅम्प सोडून जायची वेळ जवळ येत होती तसतशी मनाला हुरहूर लागत होती. एवढ्या दिवसाच्या एकत्र सहवासाने आपापसात मैत्रीचे सुंदर नाते निर्माण झालेलं आणि विशेष म्हणजे त्याला वयाचे, पैशाच्या मर्यादा नव्हत्या. शेवटी ती वेळ आलीच. जोशी ग्रुप व इतर उरलेली SP 17 बॅच ची मंडळी चेक पोईंट पाशी जमली. आम्ही आमचे लाडके मुंबईकर कॅम्प लीडर श्री गोगटे सरांना भेटलो त्यांना निरोप दिला त्यांचे आशीर्वाद घेतले. तिकडून बाहेर आल्यावर एकमेकांना हस्तांदोलन करून निरोप देत होतो. सर्वानी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. गुजराती ग्रुपने खास करून ‘आम्ही तुम्हाला खूप मिस करू’ अशी जोशी ग्रुप ला विशेष compliment दिली(आता कुणी कुणाला कुणासाठी दिली हे जोशी ग्रुप जाणतोच). तिकडून सर्वांचा निरोप घेत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
No comments:
Post a Comment