Monday, April 16, 2012

बेस कॅम्प-प्रारंभ

२० मे

सकाळी ५ वाजता शिट्टी वाजली आणि तेव्हापासून चालू झाले ते ‘शिटीमय’ आयुष्य. कारण सगळ्या गोष्टी शिट्या च्या तालावर होणार होत्या पुढचे सर्व दिवस. आम्ही उठलो, अर्ध्या तासात आवरल सगळ, आणि सकाळचा चहा घेऊन ६ वाजता रिपोर्ट करायचं होत. (नेहमीप्रमाणे)मी आणि श्रीकांत ने १० मिनिटे उशिर केला. पण पहिला दिवस असल्याने जास्त कुणी बोलले नाही. आम्हाला कॅम्प वरून जोग्गिंग करत करत अर्ध्या-एक किलोमीटर वरील मोकळ्या मैदानात नेले गेले. मी सुरुवातीला माझ्या ग्रुप बरोबर होतो मग पळत पळत सगळ्यात पुढे असलेल्या मिलिटरी मधील पंकज बरोबर सामील झालो. तसा माझा stamina चांगला असल्याने आम्ही दोघ बरोबर जोग्गिंग करत होतो. आणि सर्वात पहिले मैदानात पोहोचलो. मग युथ होस्टेल च्या ट्रेनरने बर्फात ट्रेकिंग करण्यासाठी फिट राहावे म्हणून जोरदार वॉर्म अप एक्सरसाईज करून घेतला. बरेच दिवसाने एवढा व्यायाम केल्याने जरा पाय दुखायला लागले(पण नंतर त्याचा खूप उपयोग झाला).

साधारण ७.३० पर्यंत आम्ही परत बेस कॅम्पवर परत आलो. मग नाश्ता झाला, टेंट साफ केला. त्या दिवशी आमच्या बॅचला रात्रीच्या कॅम्प फायर मध्ये कार्यक्रम सादर करायचा होता(हा नियमच आहे, प्रत्येक बॅचला कराव लागत). मग मला तिकडे काहीतरी मराठी गाण सादर करायचा प्लान डोक्यात आला. मग ‘जय जय महाराष्ट् माझा’ हे गाण मी सुचवले. पण प्रसाद-मंदार कडून मला विरोध झाला(त्यांना वाटले बरोबर वाटणार नाही ते गाण, कारण आम्ही हिमाचलमध्ये होतो आणि बाकीचे लोक दुखावले जातील अस त्यांना वाटले). मी सुरुवातीला उडवून लावलं त्यांना, मग मी विचार केला जाऊदे नको उगाच राडा!! म्हणून सेटलमेंट म्हणून ‘कोंबडी पळाली’ गायचं ठरल. पण त्यासाठी गरज होती ती गायिकेची जीला हे गाण येत किवा मराठी येणाऱ्या मुलीची. मग मी कविता आणि नेहाला कल्पना सांगितली त्यांनी होकार दिला. माझी गाणी पाठ असल्याने मी त्यांना शब्द लिहून दिले, आम्ही तालमी केल्या. मग ते गाण बसल. बाकी माझे मित्र या गाण्याला कोरस देणार होते. पण महाराष्ट् गीत गायचं माझ्या मनात कुठेतरी होत. मी जशी संधी मिळेल तस गायचच अस ठरवल. नेहमीप्रमाणे ८.३० ला जेवण झाले. मग चालू झाली ती कॅम्प फायर. सुरुवातीलाच कर्नाटक च्या १० जणांनी त्याचं राज्याच गीत ‘जय कर्नाटक माते’ चालू केल आणि आपली मराठी खोपडी सणकली. मी तिथे मित्रांना फर्मान सोडल मी महाराष्ट्र गीत गाणारच तुम्हाला साथ द्यायची तर द्या नाहीतर नका देऊ. माझ सादरीकरण शेवटी होत त्यामुळे मधल्या वेळात इतरांचे कार्यक्रम चालू असताना मी महाराष्ट्र गीतासाठी फिल्डिंग लावायला चालू केली. जो मराठी दिसेल त्यांना सामील व्हायला सांगितले. अगदी आमचे लीडर सोमणकाका पण तयार झाले. पण त्या आधी होता ‘कोंबडी’ चा पर्फोर्मंस. मी, कविता-नेहा अस तिघ मिळून ते गाण दणक्यात गायलो. मग थोडा वेळ उरलेला होतं मग मी आयोजकांना विनंती केली अजून एक गाण्यासाठी. लगेच ५ मिनिटांनी अवधूत गुप्तेचे ‘महाराष्ट्र गीत’ मी चालू केले, हळूहळू बरेच जण आमच्या पाठी कोरसला येऊन उभे राहिले आणि ते गाण तुफान म्हणल गेल. (कानडी, पंजाबी, गुजराती इत्यादी सर्वाना महाराष्ट्र गीत समजल काय आहे ते. जेव्हा परत चुकून कुणी ऐकलच त्यापैकी तर माझी आठवण नक्कीच काढतील). मग मी महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन तो परिसर दणाणून सोडला. मगच सुखाने झोपलो रात्री. एक वेगळेच समाधान मिळाले.

No comments:

Post a Comment