चालू झाला ‘शिट्टीमय’ आयुष्याचा दुसरा दिवस. सकाळी ५ लं उठून तासाभरात आटपून आम्ही ६ वाजता परत व्यायामासाठी हजर झालो. कालच्याप्रमाणेच त्याच मैदानावर जोग्गिंग करत गेलो, आमच्याबरोबर आदल्या दिवशी आलेली बॅचपण होती. मग व्यायाम आटपून नाश्ता आणि चहा साठी परत बेस कॅम्पला ७.३० ला परतलो. नाश्ता करता करता अनेक जणांनी येऊन आमची कालच्या गाण्याची स्तुती केली. कॅम्प लीडर तर म्हणाले तुमचा कार्यक्रम हा आतापर्यंत सगळ्यात हिट आहे त्या दिवशी आमच Acclamatisation होतं. म्हणजे पुढचा ट्रेक करण्यासाठी एक छोटासा ट्रायल बेसिस वर ट्रेक ज्यात आम्हाला तिकडल्या एका छोट्याश्या टेकडीवर चढवून ट्रेक ची रंगीत तालीम घेणार होते, जेणेकरून शरीर हवामान आणि त्या प्रदेशाला acclamatise झालं पाहिजे. आम्हाला दिलेल्या rucksack मध्ये blanket भरली जेणेकरून ती थोडी वजनदार होईल आणि पाण्याची बाटली घेतली आणि चालू पडलो. आमच्याबरोबर युथ होस्टेल चा ट्रेनर पण होता. जवळपास माझ्याच वयाचा, कडका पण काटक होता. २-३ किलोमीटर आम्हाला चढायचं होत. बेस कॅम्प सोडल्यावर चालू झालं ते घनदाट जंगल आणि बाजूला देवादाराची सुंदर झाडं. तेव्हा डोंगर चढता चढता तिकडे माझी अनेक जणांशी ओळख झाली. पंकज-सोनू चा ग्रुप, कानडी बाला आणि मंडळी वगेरे. मजल दरमजल करत आम्ही एकदाचे टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. चढताना पंकज-सोनू ही ९ नंबरच्या टेंटची मंडळी सारखी ‘रंगीन पांडा’, रंगीन पांडा’ आणि ‘गीलीबिली गीलीबिली चिपाक चीपाक’ म्हणून घोषणाबाजी करत होती(त्याबद्दल नंतर खुलासा केलाच आहे)
आम्हाला बाकी सर्वाना काहीच कळत नव्हत याचा संदर्भ काय. टेकडीवर(प्रदीप आणि की मंडळी )आराम करत असताना, कुणीतरी सरावंची ओळख परेड करायची कल्पना मांडली. मग सगळे पन्नास जण एकत्र बसलो व आपली ओळख करून द्यायला लागलो. बहुतांश कानडी मंडळी होती आमच्यात, आणि बरेचसे IT field मधले होते. ४ जण तर मुंबई IIT चे विद्यार्थी होते. गुजरात ची ७-८ टाळकी होती, महाराष्ट्रातले आम्ही ६ जण,सोमण काका, पंकज-सोनू च्या ग्रुप मधील अजून २-३ जण, संतोष काका, कविता-नेहा आणि त्यांची २-३ मंडळी असे १५-२० जण होतो. (मराठी असून पण आम्ही वेगवेगळेच फिरलो कधी मॉबने फिरलो नाही जसे कानडी फिरले, मराठी माणूस एकत्र येत नाही याचा अजून एक पुरावा, काय राजसाहेब कस होणार? ). अविनाश हा ओरिसाचा एकांडा शिलेदार होता. गुजराती मंडळी मध्ये दहावी झालेला १५ वर्षाचा मुलगा ते कानडी मंडळींमध्ये जेष्ठ नागरिक जोडप(ज्यांना आम्ही मा १ आणि पा म्हणायचो) आणि अजून एक जेष्ठ नागरिक ज्यांना आम्ही मा २ म्हणायचो. सोमणकाका, संतोष, नरेन, पेट्रिक, राजलक्ष्मी, विभा-महेश, विनय—विद्या ही विवाहित मंडळी होती. बाकी सर्व तरुणांचाच भरणा होता. खर तर गौरव शी ओळख माझी दिल्लीतच झालेली पण त्याच आडनाव पण जोशीच होत. आमच्या ग्रुप मध्ये ६ पैकी मी,प्रसाद,श्रीकांत,गौरव असे चार जोशी होतो, म्हणून आमचे नामकरण ‘जोशी ग्रुप’ असे करण्यात आले. मग थोड्यावेळाने ट्रेनर च्या आदेशानुसार परत उतरायला लागलो तेव्हा असच गप्पा मारत मारत कधी पायथ्याशी आलो ते कळलच नाही. खाली उतरल्यावर १ ग्रुप फोटो घेतला(५० जणांचे किमान ३०-३५ कॅमेरे असल्याने १५ मीनीट त्यातच गेली, एका जागी बसायची सवय नाही ना एवढा वेळ ). मग परत बेस कॅम्पला आलो टेंट साफ केला. तोपर्यंत जेवायची वेळ झालीच होती. मग १२.३० लं जेवलो.
दुपारी ३ वाजता आमच orientation होतं. युथ होस्टेल च्या कासोल बेस कॅम्प चे मुख्य गोगटे सर आणि एक अजून एक सर(बंगाली होते, नाव आठवत नाही, होता कुणीतरी बॅनर्जी). त्यांनी आम्हाला पुढच्या वाटचाली विषयी माहिती दिली. आणि आपले ठाण्याचे सोमणकाका यांना आमच्या SP-17 बॅचचे लीडर केले गेले(खर तर त्यांना आम्ही आधीच लीडर केलेला, राहिलेली औपचारिकता). आणि ओरिसाचा अविनाश ला Enviourment Leader केले गेले. रंगीन पांडा’ या आमच्या ग्रुप च्या टोपण नावाचा किस्सा तेव्हा कळला. सोमण काका हे एशियन पेंट्स मध्ये काम करतात आणि त्याचा लोगो ‘पांडा’ प्राणी आहे. आणि त्याचं जॅकेट फार रंगीबेरंगी होत आणि ते लीडर असल्याने रंगीन पांडा’ हे ग्रुपचे नाव रूढ झाले. मग नंतरच्या वेळेत आम्ही चहा घेतला. रात्री जेवण मग कॅम्प फायर. त्या कॅम्प फायर ला बराच बोर झालं. आम्ही हुल्लडबाजी करत, प्रेक्षकातून कॉमेंट पास करत होतो आणि सतत रंगीन पांडा’ घोषणाबाजी करत होतो. कार्यक्रम झाल्याने नेहमीप्रमाणे bournvita पिऊन झोपलो.
No comments:
Post a Comment