अखेर तो दिवस उजाडला. सकाळी सर्व आप्तांना कळवून मी जेऊन आईबरोबर दुपारी १ च्या सुमारास निघालो. गरीबरथ वांद्रे टर्मिनस स्थानकातून निघते. वांद्रेपर्यंत चे तिकीट काढून २ च्या लोकलने दादर गाठले. दादरला प्रसाद, श्रीकांत आणि प्रदीप भेटले. मग आम्ही ब्रीज चढून पश्चिम रेल्वेच्या लोकलने वांद्रे गाठले. वांद्रे स्थानकात मंदार बोरिवलीहून आला. गौरवने दिल्लीकडे पश्चिम एक्सप्रेसने आधीच प्रयाण केले होते,त्यामुळे तो दिल्लीत भेटणार होता. वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनस हे १५ मिनिटाचे अंतर भर उन्हात आम्ही कापले. तो भाग झोपडपट्टीचा आणि अत्यंत घाणेरडा आहे. आईने कोरडा खाऊ न त्या दिवशीच रात्रीच जेवण अस भरगच्च अन्न बरोबर दिल्याने मला सामानाचा तिसरा जोड करावा लागला. आम्ही ३.३० च्या सुमारास एकदाचे वांद्रे टर्मिनस गाठले. गाडी ५.३० ची असल्याने निवांत होतो. मग एकमेकांच्या ओळखी झाल्या कारण प्रसाद आणि श्रीकांत सोडून, प्रदीप आणि मंदार मला नवीनच होते. काही वेळाने माझे आणि प्रसादचे बाबा ऑफिस मधून परस्पर वांद्रे टर्मिनसला आले. मग मी आणि प्रसाद गाडीच्या डब्यांची स्थिती पाहायला गेलो. वांद्रे टर्मिनस चे दुसरे टोक जवळपास खारच्या वेशीपर्यंत जाते. तिकडे स्टेशन मास्तरकडे चौकशी केली, तिकडे काही स्थिती कळली नाही, मग आम्ही तसेच परत आलो. साधारण ५ वाजता इलेक्ट्रोनिक इंडिकेटर वर नेमका आम्ही बसलो तिकडे आमचा ग१ डब्बा येणार होता. गाडी वेळेवर आली मग आम्ही चढलो, बेग ठेवल्या. या चौघांचे बर्थ २१-२४ असे ओळीत होते मला ७५ क्रमांकाचा बर्थ होता. पण ते आम्ही परस्पर adjust करून घेतले. ५.३० ला गाडी वांद्र्याहून रवाना झाली आणि आम्ही सर्वांचा निरोप घेतला.
आमच्या समोरच्या बर्थ वर एक गुजराती कुटुंब आल्यापासून डबा डोक्यावर घेत होते, त्यांचे वैशिट्य म्हणजे त्यांनी गाई सुटल्यापासून ते चरायला सुरुवात केली ते दिल्ली पर्यंत त्याचं चरण चालूच होत. मी मंदार,प्रसाद गप्पा मारत होतो. श्रीकांत पुस्तक वाचत बसलेला. प्रदीप बर्थवर आडवा झाला(त्याला झोपायची किती आवड आहे ते नंतर समजलच). साधारण ८.३० सुरत आलं. मग आम्ही जेवायला बसलो. मंदारचा शनिवारचा उपवास होता त्यामुळे त्याने उपवासाचा चिवडा आणलेला(नंतर चुकून बाकरवडी तोंडात टाकली आणि गिळल्यावर कळल पठठयाला उपवास आहे ते). मे मटकीची उसळ, प्रसादने परोठे, श्रीकांतने चित्रान्न(कानडी भात) आणलेला. संपवताना नाकी नऊ आले सगळ्यांच्या(शेवटी मीच संपवल सगळ). मग तासाभराने बडोदा स्थानकात मी आणि प्रदीप उतरलो तिकडे शीतपेय घेतली. १० च्या सुमारास झोपायचे ठरले, बॅगाना व्यवस्थित कुलूप लावली. मग श्रीकांत-प्रदीप सर्वात वरच्या बर्थवर, मंदार-प्रसाद मध्ये आणि मी सर्वात खालच्या बर्थवर झोपलो(झोप लागली नाही सामान चोरीला जाण्याच्या भीतीने,जग राहव म्हणून पुस्तक वाचत बसलो होतो उशिरापर्यत). मध्येच रात्री समोरच गुजराती कार्ट उठल आणि खायला मागायला लागला आईकडे त्याच्या. आश्चर्य म्हणजे आईने त्याला खाकरा दिल्या(मनात विचार आला, आमच्या आईने उत्तरपूजाच केली असती आपली) वाचता वाचता झोप कधी लागली कळलच नाही.
No comments:
Post a Comment