Monday, April 16, 2012

हिमाचल प्रदेश मध्ये एन्ट्री

सकाळी ८.३० ला जाग आली तेव्हा पहिले दिसला तो घाटाचा रस्ता. अजस्त्र हिमालय, पार्वती नदीचे विशाल प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याचे पात्र, आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग. तो घाट अत्यंत वेड्यावाकड्या वळणांचा आणि अरुंद होता. रात्रभर अरुंद सा वरून बसून पूर्ण अंग धरले होते. पायाची तर पुरती वाट लागलेली(वाटल भून्तरला उतरल्यावर हाडांचा हिशोब जमवावा.) अखेरीस मंडी शहर ओलांडून आम्ही ९ च्या सुमारास भून्तर गाठले. रात्री जेवलो नसल्याने कडकडीत भूक लागलेली. तिकडे एका छोटेखानी धाब्यावर गरम गरम परोठे आणि जिलेबीचा नाश्ता केला. दिल्लीतील प्रचंड उष्म्याचा, २ दिवसाच्या प्रवासाचा त्रास इकडल्या हवेतील गारव्याने खूप कमी झाला. गार हवेत गरम चहा प्याय्लावर फारच फ्रेश वाटल. मग मंदार प्रदीप गौरव काही खरेदी करायला भून्तर च्या बाजारात गेले. मग मी आणि प्रसाद भून्तर फिरायला गेलो. अतिशय छोटे, सुंदर, पंधरा हजार वस्तीचे गाव. जवळपास सर्व गोरे लोक, घरे पण छोट्या आकाराची आणि नियोजनबद्ध. आता इंटरनेट सारखी सोय पण या दुर्गम गावात आहे. हिमाचल प्रदेश च्या हवामानाचे वैशिट्य म्हणजे इकडे हवा मिनिटा मिनिटाला बदलते. घटकेत मळभ दाटून येत, तर मध्येच उन. कधी जोरदार पाऊस. सगळच अनिश्चित. मी तिकडे एक जर्सी विकत घेतली एक आठवण म्हणून. खर तर युथ होस्टेल चा बेस कॅम्प हा ‘कसोल’ गावात होता, जे भून्तर पासून तासभर आहे. मग सगळ्याचं आवरून झाल्यावर आम्ही ‘कसोल’ ची बस पकडली आणि साधारण ११-११.३० ला युथ होस्टेल च्या बेस कॅम्प वर पोहोचलो.

जवळपास अडीच दिवस प्रवास करून आम्ही कसोल गाठले. तिकडे आम्हाला पहिले reporting करायचं होतं. सगळ्या कागदी औपचारिकता पूर्ण केल्या. आमच्या बॅचचे नाव होते SP-17. याचा अर्थ सारपास लं जाणारी युथ होस्टेल ची १७ वी बॅच. आम्हाला ६ नंबरचा टेंट मिळाला. तिकडे आधीच्या बॅचचे काही लोक होते जे आदल्या दिवशी आलेले. मग आम्हाला Blankets, Sleeping bags, Rucksack दिल्या गेल्या. साधारण १२.३० च्या सुमारास जेवण मिळाले. इथे एक विशेष सांगावेसे वाटते कि अख्ख्या ट्रेक मध्ये कधीही जेवण उशिरा किवा कमी मिळाले असे झाले नाही. खाण्यापिण्याचे नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केल्याबद्दल युथ होस्टेल च्या स्टाफला सलाम!!.

त्या दिवशी आम्हाला काही कार्यक्रम नव्हता. मग दुपारी आम्ही विश्रांती घेतली. संध्याकाळी मे सोडून सगळे जवळच्याच प्रसिद्ध ‘मणीकर्ण’ येथील गरम पाण्याच्या कुंडात अंघोळीला गेले(मी प्रवासाला कंटाळलेलो असल्याने मी अंघोळीला गोळी दिली). थोडावेळ टेंट मध्ये वाचन करत बसलो. मग कंटाळा आल्याने एकटाच फेरफटका मारायला निघालो कॅम्पचा. श्रीकांत ने त्याचा मोबाईल माझ्याकडे दिलेला असल्याने मी कॅम्प च्या आवाराचे फोटो काढत होतो. कॅम्प ची जागा ही प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पार्वती नदीच्या काठाशी होती. निसर्गाने सौंदर्याचे दान भरभरून टाकलेली जागा होती ती. नदीच्या खळखळत्या पाण्याचा प्रचंड आवाज सतत येत होता(रात्री हा आवाज भयानक वाटतो). मग तिकडे आनंद सोमण नावाचे ठाण्याचे गृहस्थ मला भेटले(कुणीतरी मराठी माणूस भेटल्याचा आनंद झाला). मग बोरिवलीचे पंकज-अर्जीन्दर सिंग यांचा ग्रुप, आमच्या टेंट मधील भावनगरच्या गुजराती बांधवांचा ग्रुप, मुंबईच्या कविता-नेहा यांचा ग्रुप, बेंगलोर च्या अदिती इन्फोटेक कंपनीच्या विभा-महेश, आनंद-ह्युबी यांचा ग्रुप, यांच्याशी ओळख झाली(बाकीच्यांची ओळख दुसऱ्या दिवशी झालीच). आमची ५० जणांची बॅच होती. तेवढ्यात हे पाच जण अंघोळ करून परत आले. मग दुपारी चहा झाला. रात्री ८.३० ला जेवण आणि नंतर ‘कॅम्प फायर’ होती. ती एन्जोय करून आम्ही १० वाजता Bournvita(युथ होस्टेलच देते) पिऊन झोपलो.

No comments:

Post a Comment